मुंबई - गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या कंगना रणौतने आणखी एक वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून तिने आता शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधण्याचा कळस केला आहे. रविवारी राज्यसेभेत कृषी सुधारणा विधेयक मंजूर झाले. त्यावरुन ट्विट करत शेतकऱ्यांनाच कंगनाने लक्ष केले आहे. तिच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच काँग्रसेचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही भाजप आणि कंगनाचा निषेध व्यक्त केला आहे.
ट्विटरवरून महाराष्ट्र आणि ठाकरे सरकार वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरू केलेल्या कंगनाने यावेळी शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवले आहे. केंद्र सरकारविरुद्ध शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केले होते. ते ट्विट रिट्विट करून कंगनाने शेतकऱ्यांचा उल्लेख दहशतवादी असा केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी कृषी विषयक विधेयकांवर शेतकऱ्यांना आश्वस्त करणारं एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये एमएसपी व्यवस्था यापुढेही सुरू राहणार आहे. शेतीमालाची खरेदी सरकार करणार आहे. आम्ही येथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. बळीराजाच्या साह्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले होते.