मुंबई -शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीकडून पुन्हा समन्स पाठविण्यात आले आहे. (ED summons to Bhavana Gawali) त्यांना 24 नोव्हेंबरला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तर यापूर्वीही ईडीने दोन वेळा भावना गवळी यांना समन्स पाठविले आहेत. (Shivsena MP Bhavana Gawali News)
नेमके प्रकरण काय?
श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाने भावना गवळी यांचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने 29 कोटी रुपयांचे, तर राज्य शासनाने 14 कोटी रुपयांचं अनुदान दिले. मात्र, 43 कोटी रुपयांचे अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही. उलट 7 कोटी रुपये मूल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात आला. याच घोटाळा प्रकरणी गवळी यांनी सीए उपेंद्र मुळे यांच्यावर चुकीचा अहवाल बनवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.
हेही वाचा -राज्यातील नेत्यांचे नातेवाईक असलेल्या 'या' महिलांच्या मागे का लागलीय ईडी ?
20 ऑक्टोबरलाही हजर राहिल्या नाहीत -
शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिम येथील खासदार भावना गवळी यांना सक्तवसुली संचालनालयाने चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. मात्र खासदार भावना गवळी 20 ऑक्टोबरलाही उपस्थित झाल्या नाही. त्यांना चिकनगुनियाची लागण झाल्यामुळे त्यांनी पुन्हा 15 दिवसाचा कालावधी वकिलाच्या मार्फत ईडी अधिकार्यांकडे मागितला होता. यापूर्वी गवळी यांना ईडीने 4 ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी त्यांनी 15 दिवसांचा कालावधी मागितला होता. भावना गवळी यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी ही माहिती दिली आहे. भावना गवळी यांना चिकनगुनियाची लागण झाली. त्यामुळे त्या ईडीच्या कार्यालयात हजर राहिल्या नव्हत्या.
कोण आहेत भावना गवळी?
भावना गवळी यांचा जन्म 23 मे 1974 रोजी वाशिम येथे झाला. माझी खासदार स्व. पुंडलिकराव गवळी यांच्याकडून भावना गवळी यांना राजकारणाचे बाळकडून मिळाले. त्या पुंडलिकराव गवळी यांच्या सर्वात लहान कन्या आहेत. पुंडलिकराव गवळी यांनी सुरुवातीपासूनच आपल्या चारही मुलींना प्रोत्साहन दिले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भावना गवळी यांनी लहान वयातच राजकारणात प्रवेश केला. वडिलांच्या निधनानंतरही भावना गवळी यांनी त्यांच्या राजकारणाचा वसा समर्थपणे पुढे नेला.