मुंबई -आरोग्य विभागाच्या भरतीत उमेदवारांना परीक्षेचे केंद्रावरून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईतील उमेदवारांना गडचिरोलीतील उमेदवारांना पुण्यात परीक्षेचे केंद्र, तर पुण्यातील उमेदवारांना नाशिक, जळगावचे केंद्र मिळाली आहेत. एवढेच नव्हे, तर दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एकाच दिवशी एक केंद्र सोलापूर, दुसरे कोल्हापूरला मिळाले आहे. यापूर्वी हॉलतिकीटवरून स्थगित केलेली आणि आता घेण्यात येत असलेल्या परीक्षेतही केंद्र निवडीवरून पुन्हा एकदा गोंधळ समोर आला आहे.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी दि. 24 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. उमेदवारांना हॉलतिकीट प्राप्त होताच परीक्षेचे केंद्र अन्य जिल्ह्यात आल्याचे दिसून आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे नियमाचे पालन केले जात आहे. याउलट लांबचे प्रवास करून अन्य जिल्ह्यात परीक्षा देण्याची वेळ उमदेवारांवर आली आहे. त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
यापूर्वी आरोग्य विभागातील गट क आणि गट ड या पदासाठी दि. 25 व 26 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार होती. त्यावेळी प्रवेशपत्रावरून गोंधळ उडाल्याने ही परीक्षा आदल्या दिवशी स्थगित करण्यात आली. त्यावरून उमेदवारांच्या झालेल्या नाहक त्रासाबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. आता पुढच्या रविवारी होणाऱ्या परीक्षेत हाच गोंधळ पुन्हा निर्माण होत असल्याने उमेदवारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
उमेदवारांच्या अडचणी
आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी न्यासा या कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा दोन सत्रात होत आहे. दोन पदासाठी अर्ज केलेल्यांना सकाळी एका जिल्ह्यात, तर दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात परीक्षेचे केंद्र देण्यात आले. काही पदासाठी परीक्षा शुल्क भरण्यात आली नसतानाही त्यांना हॉलतिकीट देण्यात आले. जे केंद्र उमेदवारांनी निवडले, ते केंद्र न देता लांबचे केंद्र देण्यात आले. यावरून उमेदवारांनी संबंधित कंपनीला धारेवर धरले आहे. ही कंपनी निवडल्याबद्दल राज्य सरकारच्या आरोग्य विभागावर टीका होऊ लागली आहे.