महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 24, 2020, 11:06 AM IST

Updated : Oct 24, 2020, 5:02 PM IST

ETV Bharat / state

मुंबईच्या सेंट्रल मॉलला लागलेल्या आगीवर तब्बल 39 तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश

मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीवर तब्बल 39 तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास ही आग लागली होती. आज सकाळी 11 च्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आली.

city_mall fire
सिटी सेंटर मॉलची आग नियंत्रणानंतर पुन्हा धुमसली

मुंबई - मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री ८.५३ वाजता आग लागली होती. ही आग मॉलमध्ये सर्वत्र पसरल्याने निर्माण झालेल्या धुरामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या. काल दुपारी ३.३७ वाजता ही आग सर्व बाजूने कव्हर करण्यात आली होती. आग विझवण्याचे काम आज दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. सकाळी ११.५० च्या दरम्यान म्हणजेच तब्बल ३९ तासांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती मुंबई अग्निशमन दल आणि पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबई सेंट्रल बस स्थानकाच्या जवळ असलेल्या सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास आग लागली. ही माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहने रवाना केली. मोठ्या प्रमाणावर आग पसरल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. तब्बल 39 तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

आगीवर तब्बल 39 तासांनी निंयत्रण

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 250 कर्मचारी

सिटी सेंटर मॉलची इमारत चार मजली असून, सर्वात प्रथम आग ही दुसऱ्या मजल्यावर लागली होती. या मजल्यावर मोबाईल, प्रिंटर, स्टेशनरी, फर्निचर आणि इतर साहित्यांचे गाळे आहेत. या गाळ्याना ही आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही आग तिसऱ्या मजल्यावर देखील पसरली असल्याचे लक्षात आले.आग विझवण्यासाठी २४ फायर इंजिन, १६ जंबो टँक यांच्यासह एकूण ५० अग्नि विमोचक वाहने तैनात करण्यात आली होती. मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्यासह एकूण सुमारे २५० अधिकारी व कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान या आगीमध्ये 5 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

Last Updated : Oct 24, 2020, 5:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details