मुंबई - अनलॉक जाहीर झाल्यापासून मुलुंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहेत. एक जूनपासून अनलॉक जाहीर झाल्यानंतर दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. यामुळे नागरिकांनी रस्त्यांवर आणि बाजारपेठेत गर्दी करण्यास सरुवात केली. याचा परिणाम म्हणून मागील दोन दिवसात मुलुंडमध्ये 144 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
येथील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हजारच्या वर गेली आहे. त्यापैकी 739 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक आमदार मिहीर कोटेचा यांनी केले आहे.
मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना सगळ्यात कमी रूग्ण संख्या अशी टी वॉर्डची(मुलुंड) ओळख होती. मात्र, आता येथील रुग्णसंख्या एक हजारच्या वर गेली आहे. 10 जून व 11 जून या दोन दिवसात 144 रुग्णांची भर पडली आहे. या 144 नागरिकांपैकी 120 जण हे वसाहतींमध्ये राहणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या वसाहतींमध्ये आता तपासणी सुरू करावी लागली आहे, अशी माहिती आमदार कोटेचा यांनी दिली.
वाढणारी रुग्ण संख्या ही झोपडीपट्टीमूळे वाढत आहे, असा समज आहे. मात्र, सध्याचे आकडे पाहता 144 पैकी 120 केसेस इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आहेत. यामुळे सर्वच नागरिकांनी सतर्कता पाळली पाहिजे, असे आवाहन कोटेजा यांनी केले आहे.