मुंबई - राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना, हा आजार दिवसेंदिवस आणखी जीवघेणा ठरत आहे. कारण आता कोरोनाचे शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. रूग्ण कोरोनामुक्त होत आहेत, पण त्यानंतर मात्र त्यांना इतर विविध आजार होत असल्याचे निदर्शनात आले आहे. कोरोनाचे विषाणू रुग्णांच्या फुफ्फुस, यकृत, दृष्टी, हृदय, किडनी आणि मेंदूवर वाईट परिणाम करत आहेत. तर उच्च रक्तदाब, मधुमेहासारखे आजार वाढवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आजारांना पोस्ट कोविड आजार असे म्हटले जात आहे. तर सध्या एकूण रुग्णांपैकी 5 ते 10 टक्के रुग्ण पोस्ट कोविड आजार होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणं आहे.
कोरोना हा श्वसनाचा आजार आहे. याचे विषाणू नाकातून, तोंडातून शरीरात गेल्यानंतर ते सर्वात आधी फुफ्फुसावर हल्ला करतात. त्यामुळे त्याचा फुफ्फुसावर परिणाम होतोच. तर कोरोनाचा आजार बळावल्यानंतर विषाणू फुफ्फुसाबरोबर किडनी, यकृतावर परिणाम करत आहे. यात रुग्ण पन्नाशीच्या पुढचा असेल तर त्याच्यासाठी हा आजार जीवघेणा ठरत आहे. त्यातूनच मृत्युदर वाढत आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. पण आता यापूढे जात कोरोनामुक्त झालेल्यासाठी ही हा आजार जीवघेणा ठरत आहे. कारण रूग्ण कोरोनामुक्त झाले तरी काही दिवसानी त्यांना इतर आजार जडत आहेत. त्यात मुख्यत्वे श्वसनाचे विकार आहेत.
फुफ्फुसावर परिणाम झालेल्यापैकी 50 टक्के कोरोना रुग्णांना श्वसनाचे विकार होत असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली. या रुग्णांना घरीही ऑक्सिजनची गरज पडत असून यातील काही रुग्णांना तर कायमस्वरूपी ऑक्सिजनची गरज पडत आहे. तर वय पन्नासच्या आतील 80 टक्के रुग्ण अगदी ठणठणीत बरे होत आहेत. पण त्याचवेळी 20 टक्के रुग्णांना कायम अशक्तपणा, डोकेदुखी, अंगदुखी असे त्रास जाणवत आहेत. महत्वाचे म्हणजे ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाचे आजार आहेत त्यांच्यात कोरोनामुक्तीनंतर हे आजार आणखी वाढत आहेत. त्यामुळे त्यांना औषधाची मात्रा वाढवावी लागत आहे. तर असे आजार बळावल्यास मृत्यू ओढवण्याची ही भीती असल्याचेही डॉ. भोंडवे यांनी सांगितलं.
कोरोना विषाणू दृष्टीवरही परिणाम करत आहे. काही रुग्णांच्या डोळ्यांवर परिणाम होऊन त्यांना कमी दिसू लागल्याची उदाहरणे आता समोर येऊ लागली आहेत. दुसरीकडे गर्भवती मातांकडून बाळांना कोरोनाची लागण होऊन बाळाचा पोटातच मृत्यू होत असल्याच्याही घटना समोर येत असल्याचे डॉ. भोंडवे सांगतात.
मुंबईत पालिकेच्या सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयाचे आणि सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी 5 ते 10 टक्के कोरोनामुक्त रूग्ण पोस्ट कोविड आजाराचे शिकार होत असल्याचे सांगितले आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर ही अनेक रुग्णांना थकवा आणि अशक्तपणा जाणवत आहे. तर पोस्ट कोविडमध्ये सर्वाधिक रुग्णांना श्वसनाचे आणि किडनीचे आजार होत आहेत. फुफ्फुस आणि किडनी व्यवस्थित काम करत नसल्याने वा हे अवयव निकामी होऊ लागल्याने रुग्णांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचेही ते सांगतात.