मुंबई : मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीला बेस्ट कंत्राटी कामगारांच्या नेत्या प्रज्ञा खजुरकर आणि इतर १५ ते २० जण उपस्थित होते. संप मागे घेतल्याने लवकरच मुंबईतील वाहतूक पूर्ववत होणार आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची झळ मुंबईकरांना बसत होती. मुंबईतील 20 आगारांमधील भाडेतत्त्वावरील १६७१ पैकी तब्बल 1375 बस सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
सोमवारी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या कंत्राटी कामगारांच्या शिष्टमंडळाची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत कोणताही मार्ग निघाला नव्हता. अखेर या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करून तोडगा काढावा लागला. 2 ऑगस्टपासून सुरू झालेला हा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप 7 दिवस चालला. या संदर्भात शनिवारी 5 ऑगस्ट रोजी बेस्ट प्रशासनाने कंत्राटी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीत देखील कोणताही तोडगा निघाला नव्हता. सोमवारी 7 ऑगस्ट रोजी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक बोलावली. मात्र, या बैठकीतही तोडगा निघाला नाही.
अखेर सोमवारी संध्याकाळी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आझाद मैदान येथे संपकऱ्यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणली. आम्ही पण बेस्टच्या सेवेतील कर्मचाऱ्यांसारखेच काम करतो. त्यामुळे आम्हालासुद्धा त्यांच्याप्रमाणेच वेतन देण्यात यावे. अशी मागणी या कर्मचाऱ्यांची आहे. समान काम समान वेतनासोबतच बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा पुरवते त्या देखील आम्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात याव्यात.
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेस्टमध्ये विलनीकरण करण्यात यावे. अशा मागण्या या संपकरी कर्मचाऱ्यांच्या आहेत. प्रतीक्षानगर आगार येथे वाहक म्हणून कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचारी विशाखा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, आमच्यामुळे मुंबईकरांना जो त्रास होत आहे, त्यासाठी आम्ही सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, आमच्या देखील काही समस्या आहेत. त्या देखील मुंबईकरांनी समजून घेतल्या पाहिजेत. आम्हाला पुरेसे वेतन दिले जात नाही. बारा ते पंधरा हजारामध्ये घर चालवावे लागते.
आजारपणात एखादा दिवस सुट्टी झाली तर त्याचेदेखील पैसे कापले जातात. अशावेळी आम्ही काय करायचं? त्यामुळे संप हा एकमेव मार्ग आमच्याकडे आहे. या संपकरी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंत्राटदार कंपन्यांनी आता सेवेत रुजू होण्यासाठी नोटिस पाठवल्या असून, तुमच्या अचानक पुकारलेल्या बेमुदत संपामुळे कंपनीची बदनामी होत आहे. याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात. लवकरात लवकर पुन्हा सेवेत रुजू न झाल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. असे या कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. या पत्रामुळे कर्मचारी अधिकच आक्रमक झाले होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.