मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या घरावर एसटी कर्मचाऱ्यांकडून हल्ला करण्यात आला. या नंतर राज्यातील पोलिस यंत्रणा तसेच गुप्तचर यंत्रणा नेमकी काय करते? या बाबतचा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे. घटनेचे गांभीर्य पाहता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि कायदा व सुव्यवस्था सहपोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांची बैठक बोलावली. बैठकीत घटनेबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सदावर्ते यांच्या आरोपांबाबत चर्चा -एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून तसेच त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याकडून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अर्थमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहे. त्यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपाबाबत कायदेशीर कारवाई करता येईल का? याची देखील चाचपणी या बैठकीत झाल्याची माहिती मिळत आहे. न्यायालयाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. उद्या सदावर्ते यांना कोर्टात हजर करावे लागेल. यावेळी सदावर्ते यांच्या विरोधात राज्य सरकारकडून योग्य ते कायदेशीर पुरावे न्यायालया समोर ठेवावे याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती आहे.