मुंबई- मी स्वतः सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जबाबदारी स्वीकारली आहे. उद्याच्या उद्या सारथी संस्थेला आठ कोटींचा निधी दिला जाईल. मराठा समाज समन्वयकांसोबतच्या बैठकीत वाद झाला नाही. ते माध्यमांनी रंगवलेले चित्र असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या दालनात बोलावून बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.
मराठा समाजाचे आणि सारथीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावेल, असेही अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी सारथीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आयोजित बैठकीत खासदार संभाजीराजेंना स्वतः फोन करुन बोलावले होते. मात्र, बैठकीत संभाजीराजे यांना खाली बसवल्याचा मुद्दा उपस्थित करत संभाजीराजेंच्या समर्थकांनी गोंधळ घातला. त्यामुळे मराठा समन्वयकांसोबत सुरू झालेली बैठक लगेचच आटोपली. विशेष म्हणजे यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी बोलण्यास सुरुवात केली. मात्र, अजित पवार यांनी आपण दालनात बोलू असे म्हणत बैठक सोडली. यानंतर मराठा समाजाच्या समन्वयकांनी जाणून बुजून छत्रपती संभाजीराजेंचा अपमान केल्याचा आरोप केला होता.
समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते म्हणूनच प्राथमिक बैठक मोठ्या सभागृहात घेतली असे स्पष्टीकरण अजित पवारांनी ओरोपानंतर दिले. सारथीचे काम नियोजन विभागाच्या अखत्यारित घेतले जाणार आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ हे नियोजन खात्याच्या अख्यारित घेणार, असेही त्यांनी सांगितले.
सारथीवर उत्तर शोधायचे की फाटे फोडायचे? मला सारथीवर मार्ग काढायचा आहे, यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावणार, दर दोन महिन्यांनी याचा पाठपुरावा घेणार. मराठा-ओबीसी असा वाद भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, असा कोणताही विषय नाही, संभाजीराजेंच्या ट्विटनंतर मी स्वतः विजय वडेट्टीवारांशी बोललो अल्याचे पवारांनी सांगितले.
संभाजीराजे छत्रपती यावेळी बोलताना म्हणाले की, मराठा समाजाने गैरअर्थ घेऊ नये. काही निर्णय घ्यायचे होते म्हणून अजित दादांनी दालनात बैठक घेतली. या संस्थेची स्वाययत्ता कायम राहिली पाहिजे. सारथी टिकवायची आहे, स्वायत्तता टिकवायची आहे, पवार साहेबांनी निर्णय घेतलेत, कुणी गोंधळ आणि गैरसमज करुन घेऊ नये, पूर्वीच्या सचिवांनी संस्थेची स्वायत्तता मोडीत काढली. पवारांनी शब्द दिलाय, सारथीची स्वायत्तता टिकेल, त्याची जबाबदारी त्यांनी स्वत:कडे घेतलीय. सारथी ही शाहू महाराजांच्या नावाने सुरू असलेली संस्था, ती बंद होणार नाही, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम आणि सारथीचं काम आता एकाच छताखाली सुरू होईल.