मुंबई -मागील सहा वर्षांत मुंबईकरांची तिसरी लाइफलाइन बनलेली मेट्रो 1 (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) सात महिन्यांपासून बंद आहे. कोरोनाच्या काळात फिजिकल डिस्टन्सिंग पाळत सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी मुंबईकर मेट्रो कधी सुरू होणार? याची वाट पाहत होते. अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. उद्यापासून (सोमवार, 19 ऑक्टोबर) मेट्रो 1 वाहतूक सेवेत दाखल होत आहे. सकाळी साडेआठला वर्सोवा आणि घाटकोपर मेट्रो स्थानकावर मेट्रो सुटणार आहे. लोकलमध्ये अद्याप सर्वसामान्य मुंबईकरांना प्रवेश नसताना मेट्रोचा एक फास्ट आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध झाल्याने मुंबईकरांसाठी ही आनंदाची आणि दिलासादायक बाब असणार आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 22 मार्चपासून मेट्रो 1 बंद आहे. आता राज्य सरकारने मेट्रो रेल सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर सर्व तयारी करत आता नव्या नियमांसह, बदलांसह मेट्रो 1 आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमओपीएल) सज्ज झाली आहे. लॉकडाऊनमध्ये केवळ सर्वसामान्यांसाठी मेट्रो 1 बंद होती. मेट्रो गाड्यांची ट्रायल रन, साफसफाई आणि कोरोना काळात मेट्रो प्रवास सुरक्षित करण्यासाठी जे काही बदल करायचे होते, ते बदल करण्याचे काम मे महिन्यांपासून सुरू होते. त्यामुळेच मेट्रो सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर तीन-चार दिवसांत मेट्रो सेवेत दाखल करणे शक्य झाले आहे.