मुंबई- लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेस राज्यात बरीच अडचणीत सापडलेली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसकडून येत्या काळात सोशल इंजिनिअरिंगचा फार्मूला वापरण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठीच येत्या काही दिवसात विरोधी पक्षनेते पदी काँग्रेसकडून राज्यातील दलित, ओबीसी आणि मराठा यापैकी कोणता चेहरा देता येईल याविषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मंथन सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे काँग्रेसच्या तब्बल 10 हून अधिक जागांना मोठा फटका बसला होता. हीच परिस्थिती विधानसभेच्या निवडणुकीत राहिली तर, काँग्रेसला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. त्यामुळे वंचित आघाडीला पर्यायी म्हणून काँग्रेसमध्ये दलित अथवा मुस्लिम चेहरा देता येईल काय अथवा त्यासोबतच ओबीसी किंवा मराठा चेहरा लाभदायी ठरेल का? अशा स्वरूपाची चर्चा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू असल्याचे सांगण्यात येते. तर, राज्यातील दलितांना पुन्हा काँग्रेसच्या बाजूने आणण्यासाठी काँग्रेसच्या दलित नेत्यांना खास जबाबदारी देण्यात येणार असून त्यात प्रामुख्याने सुशीलकुमार शिंदे, वर्षा गायकवाड यांची नावे यासाठी निश्चित केली असल्याचे सांगितले जात आहे.