मुंबई- लॉकडाऊन काळात लोकल, बेस्टमधून प्रवासाला बंदी, करोना संसर्गाच्या भीतीपोटी ग्राहकांनी फिरविलेली पाठ, कारागिरांना द्यावा लागणारा महिन्याचा पगार, अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात मुंबईतील दुकानदार आणि व्यापारी अडकले आहेत. व्यापऱ्यांचा कारभार ठप्प झाला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अभियानाची घोषणा करीत मुंबईतील दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, लोकलमधून केवळ जीवनावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यामुळे, व्यापारी आणि कारागिरांना दुकानापर्यंत पोहोचण्यासाठी खासगी वाहनांचा किंवा बेस्ट बसचा आधार घ्यावा लागत आहे. त्यात दूर राहणाऱ्यांना दुप्पट पैसे खर्च करून प्रवास करावा लागत आहे. दुकाने उघडली असली तरी करोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने ग्राहकांनी दुकानांकडे पाठ फिरवली आहे. तुरळक संख्येने ग्राहक येत आहेत. त्यातून दिवसभराचा खर्चही निघत नाही. त्यातच दुकानातील वस्तू निर्जंतूक करण्याचा खर्च वाढला आहे. हे सर्व व्यापाऱ्यांना परवडेनासे झाले आहे.