मुंबई - बारावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने पदवी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीतच मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या बहुतांश महाविद्यालयातील प्रवेश हे फुल्ल झाले असल्याचे समोर आले आहे. अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये 90 टक्केच्या दरम्यान गुणवत्ता यादी पोहोचली आहे. तर काही ठिकाणी गुणवत्ता यादी ७० टक्केच्या दरम्यान येऊन थांबली आहे. मुंबई विद्यापीठाने पदवी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली असून त्यात मुंबईतील नामांकित महाविद्यालयातील जागा दुसऱ्या गुणवत्ता यादीतच पूर्ण भरल्या गेल्या आहेत. यामुळे प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार 17 ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या गुणवत्ता यादीत किती जागा शिल्लक राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अद्यापही अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या परीक्षा पार पडलेल्या नाहीत. यामुळे अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी पारंपारिक बीएसस्सीसाठी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीपूर्वीच प्रवेशाच्या जागा पूर्ण भरल्या आहेत. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना यादरम्यान आपल्या पसंतीनुसार प्रवेश मिळालेले नाही, त्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीयच्या प्रवेशानंतर जागा रिकाम्या होतील, त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रतिक्षा करावी, असे मत प्राचार्यांकडून व्यक्त करण्यात आले.
पदवीची दुसरी गुणवत्ता यादी -
एचआर महाविद्यालयातील - बीकॉम - ९४.४, बॅफ - 94.6 बीएफएम - 93.2 ,बीबीआय - 89.38 ,बीएमएस : आर्टस् - 89.5 , कॉमर्स - 95.8 , सायन्स - 86.6 , बीएमएम : आर्टस् - 92, कॉमर्स - 89.8 , सायन्स - 85
रुपारेल महाविद्यालय -बीए - 88 , बीकॉम- 81. 23, बीएससीआयटी : गणित विषयातील गुण - 58, बीएमएस : आर्टस् - 60, कॉमर्स - 85.53, सायन्स - 71.07, बीएससी - 71. 69
पोद्दार महाविद्यालय - बीकॉम - 92.50, बीएमएस : आर्टस् - 82.62, सायन्स - 84.31 , कॉमर्स - 93.6 , इतर - 75.23