मुंबई - मराठा समाजासाठी आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) राखीव जागांवर प्रवेश असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने सुरू झाली. यामुळे अकरावीच्या विशेष फेरीची गुरुवारी जाहीर होणारी प्रवेश यादी पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच विशेष फेरीतील प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. तर आता 27 डिसेंबपर्यंत अर्ज भरता येईल.
नव्याने अर्ज भरु शकणार
विशेष फेरीसाठी विद्यार्थी नव्याने अर्ज भरू शकणार आहेत. मराठा प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी राखीव जागांवर त्यांना प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांना अर्जात बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे. याआधी विशेष फेरीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे. त्यांना बदल करायचा नसल्यास त्यांचा अर्ज मात्र कायम राहील. विद्यार्थ्यांना अर्जात बदल करायचा नसल्यास त्यांनी अर्जाचा पहिला भाग ‘अनलॉक’ करू नये. दरम्यान, अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. नियोजित वेळापत्रकानुसार विशेष फेरीची प्रवेश यादी गुरुवारी जाहीर केली जाणार होती. राज्य सरकारकडून सामाजिक-आर्थिक दुर्बल प्रवर्गातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांसाठी राखीव जागांवर प्रवेश घेण्यास परवानगी देण्याचा निर्णय बुधवारी घेतला गेला. त्यामुळे विशेष फेरीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून गुरुवारी प्रवेश यादी जाहीर करण्यात आली नाही. विशेष फेरीसाठी अर्ज करण्याचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.
प्रवेश फेरी पुढील प्रमाणे
26 डिसेंबर - सायंकाळी पाच वाजेपर्यंत – ‘एसईबीसी’ प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांंनी खुला किंवा ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्ग निवडून प्रवेश अर्जाचा भाग एक भरून अर्ज पडताळून घेणे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला नाही परंतु प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे ते अर्ज भरु शकतात.
27 डिसेंबर - महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरणे (प्रवेश अर्जाचा भाग दोन).
28 डिसेंबर - सायंकाळी पाच वाजता विशेष फेरीची प्रवेश यादी जाहीर होईल.