आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुरुंगात जाण्याच्या भीतीने मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर रडल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी यावर स्पष्टीकरण देताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री व्हा, मी पदावरून दूर होतो, असे म्हटल्यानंतर शिंदे यांच्या डोळ्यात पाणी आल्याची प्रतिक्रिया दिली.
आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचे समर्थन : हैदराबाद येथील कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी, भाजपची जुळवून घ्या नाहीतर मला जेलमध्ये जावे लागेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत उद्धव ठाकरे यांच्यासमोर रडल्याचे विधान केले. ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले जात आहे. तर शिंदे गटातून त्याला प्रत्युत्तर देण्यात येत आहे.शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी यावर खुलासा केला. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड पुकारले त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदेना मातोश्रीवर बोलावले होते. तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री व्हा मी बाजूला होतो, असे ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलत असून अतिशय चुकीचे वक्तव्य केले जात आहे. ठाकरेंच्या बाबत त्यांना आता आदर उरलेला नाही, असे केसरकर म्हणाले.
खोटे बोलणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही-राज्यातील राजकारणाला कुठल्या स्तरावर न्यायचे याची मर्यादा राहिलेली नाही. आदित्य ठाकरे खोट बोलत आहेत. खोटे बोलणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रातील जनतेला कळू दे, किती खोटारडेपणा चालला आहे. आता ठाकरेंकडून शिवसैनिकाची अवेहलना केली जात आहे. ठाकरेंवर बोलण्याची पातळी आणि अधिकार देखील राहिलेले नाहीत. खोटं बोलायचं आणि सहानुभूती मिळवायची, हेच उद्योग सुरू आहेत. पाऊस असताना शेतकऱ्यांची नावे घ्यायची. सत्तेत आल्यावर मात्र शेतकऱ्यांना कोणतीही मदत करायची नाही, असा अजेंडा ठाकररेंनी राबवला, असा आरोप केसरकर यांनी केला.भाजपच्या एका मुख्यमंत्र्यांवर आरोप करत होते. आज त्याच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला भेट दिली आहे. सत्तेवर असताना त्यांच्या ते सोबत चालतात. मात्र सत्तेतून बाहेर गेल्यावर त्यांच्यासोबत वाईट बोलणे चुकीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचा स्वाभिमान आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना आदराने बोलले गेले पाहिजे. मोदी जगाचे प्रमुख नेते असल्याचा जप मंत्री केसरकर यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांसह नारायण राणेंनी केली टीका-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आदित्य ठाकरे यांच्या वक्त्यावर दोन शब्दात प्रत्युत्तर दिले. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटातून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्यावरती टीकास्त्र सोडले. आदित्य ठाकरेंकडे कुठे लक्ष देता, जाऊ द्या हो, ते लहान आहेत अशा दोन शब्दात शिंदेंनी आदित्य ठाकरे यांचा विषय संपवला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील आदित्य ठाकरेंच्या विधानावर खोचक टीका केली. एकनाथ शिंदे भाजपसोबत नव्हे तर शिवसेना सोबत घेऊन आले आहेत. दोन्ही पक्षांचा युतीचा कारभार उत्तम चालला आहे. शाळेतील मुलांच्या प्रश्नांना जास्त महत्त्व देऊ नका. आदित्य ठाकरे बालिश आहे, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली.
हेही वाचा-Aaditya Thackeray on CM : आदित्य ठाकरेंनी बंडखोरीबाबत केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, एकनाथ शिंदेंना अटक...