मुंबई :शितल म्हात्रे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. शीतल म्हात्रेंनी आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आज विमानतळावरून युवासेनेच्या कोअर कमिटी मेंबर असलेल्या साईनाथ दुर्गे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्यानंतर रात्री अटक करण्यात आली असल्याची माहिती कायदा आणि सुव्यवस्थेचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे पुण्यातून देखील एकास अटक करण्यात आली असून त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.
चौकशी दरम्यान केली अटक : शितल म्हात्रे यांच्या व्हिडिओचे पडसाद थेट राज्याच्या विधानसभेत देखील उमटले जाणून-बुजून एका महिलेला बदनाम करण्याचे हेतूने हा व्हिडिओ माफ करून फिरवल्याचा किंवा वायरल केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामागे मास्टरमाइंड कोण हे शोधा अशी मागणी शिवसेना भाजपाच्या महिला आमदारांनी केली आहे. त्यात या प्रकरणी कारवाई करत दहिसर पोलिसांनी आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती असलेले युवा सेनेचे पदाधिकारी साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेतले होते. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरेंचे युवा सेनेतील प्रमुख चेहरा असून त्यांच्याकडे सोशल मीडियाची जबाबदारी सोपवण्यात आले आहे. युवा सेना कार्यकारणी सदस्य पदाची जबाबदारी देखील साईनाथ दुर्गे यांच्या खांद्यावर आहे.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी : दहिसर पोलीस ठाण्याच्या बाहेर साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या विरोधात आज दुपारी ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. शिंदे सरकार हाय हाय आणि माजले बोके 50 खोके अशा घोषणा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून दहिसर पोलीस ठाण्याच्या बाहेर देण्यात येत होत्या. शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली होती. ही गर्दी युवासेना पदाधिकारी साईनाथ दुर्गे यांना दहिसर पोलिसांनी अटक केल्याच्या विरोधात केली असल्याची माहिती मिळत आहे. शीतल म्हात्रे प्रकरणात आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली आहे.