मुंबई- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर शिवसेनेने आता विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेना आणि भाजपची युती विधानसभा निवडणुकीतही कायम राहणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे सहा महिन्यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी युवासेनाही सक्रीय झाली आहे. आता तर थेट युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीच विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी युवासैनिकांकडून करण्यात येत आहे.
आदित्य ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक लढवावी; युवा सेनेची मागणी - आदित्य ठाकरे
युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी इंस्टाग्रामवर आदित्य ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या या आग्रही मागणीला आदित्य ठाकरे होकार देणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी इंस्टाग्रामवर तशी मागणीच केली आहे. त्यांच्या या आग्रही मागणीला आदित्य ठाकरे होकार देणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली तर पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र दिसेल. त्यामुळे शिवसैनिकांमध्येही नवचैतन्य निर्माण होईल, यात शंका नाही.
यापूर्वी आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत बाबत आदित्य ठाकरे स्वतः काय भूमिका घेतील हे पाहावे लागेल. आदित्यने स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा त्याला संपूर्ण स्वतंत्र आहे, असे उध्दव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्पष्ट केले होते.