मुंबई- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी आणि राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून निवडून यावे, अशी इच्छा सर्वच शिवसेनेचे नेते पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. अखेर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा स्वत : केली आहे. वरळीतील विजय संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केली. यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विजय संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. यावेळी आई रश्मी ठाकरे, भाऊ तेजस ठाकरे हे देखील उपस्थित होते. ठाकरे घराण्यातून आदित्य ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा अर्ज ते वरळी विधानसभेतून भरणार आहेत.
हेही वाचा - चंद्रकांत पाटलांच्या अडचणीत वाढ, कोथरूडमधील उमेदवारीला ब्राह्मण महासंघाचा विरोध
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मी जनतेचे आभार मानण्यासाठी जनआशीर्वाद यात्रा केली. यात्रेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी मी लोकांच्या मनातील भावना ओळखण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिक म्हणून काम करताना आनंद होत आहे. हा ऐतिहासिक क्षण असून वरळीचा विकास करणार आहे. मला मुख्यमंत्री बनायचे आहे म्हणून मी हा निर्णय घेतलेला नाही. नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. मला उडी मारण्याची भिती नाही, पडलो तर तुम्ही मला पकडायला आहात. हा निर्णय मी स्वतः साठी किंवा मला आमदार, मुख्यमंत्री बनण्यासाठी घेतलेला नाही. मला महाराष्ट्रचे भले कारायचे आहे. सर्व भेदभाव दूर करून महाराष्ट्र एक करायचा आहे, असेही आदित्य यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - 'शिवस्मारकाच्या घोटाळ्याची केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार करणार'
अखेर निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघवर शिक्कामोर्तब झाले असून या मतदारसंघातून शिवसैनिकांनी तयारी देखील केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सचिन अहिर शिवसेनेत आल्यामुळे वरळी विधानसभेतील शिवसेनेची ताकद भक्कम झाली आहे. ठाकरे घराण्यात पहिल्यांदा आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे लागणार आहे.