मुंबई - सुशांतसिंहच्या प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणावर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. राज्य सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. परंतु, मी आजही संयम बाळगलाय. अशाप्रकारे चिखलफेक करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल अशा भ्रमात कोणी राहू नये. असा कडक इशारा देत कॅबीनेट मंत्री व युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या सुशांतसिंह प्रकरणात करण्यात येणाऱ्या टिकेवर मौन सोडले.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी आपले मौन सोडले आहे. हे गलिच्छ राजकारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक सुरू करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे, अशी सणसणीत टीका आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता भाजपवर केली आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात सर्व प्रकरणाशी आपला काडीमात्र संबंध नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.