मुंबई - राज्यातील विधान परिषद निवडणुकांमध्ये भाजपाचा दावा फोल ठरवत सत्ताधारी महाविकास आघाडीला चांगलेच यश प्राप्त झाले आहे. दरम्यान, आज बेस्टच्या ताफ्यात आज २६ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या विजयावर प्रतिक्रिया दिली. आघाडी सरकारचा पुढील प्रवासही असाच इलेक्ट्रिक बससारखा स्मूथ, पॉल्यूशन फ्री आणि ब्रेक न लागता वेगाने होणार आहे. असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबईसारख्या शहर भागात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व इंधनाची बचत करण्यासाठी बेस्ट परिवहन विभागाच्या ताफ्यात २६ इलेक्ट्रीक बसेस दाखल झाल्या आहेत. टाटा मोटर्सने बनवलेल्या या एसी इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नरिमन पॉईंट, मुरली देवरा चौक या ठिकाणी करण्यात आले.
यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत पालिकेतील विरिधि पक्ष नेते रवी राजा, बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईसाठी आनंदाची गोष्ट -
दरम्यान, आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईसाठी आनंदाची गोष्ट आहे की, ३४० इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत. त्यापैकी २६ आल्या आहेत. सध्या ४६ इलेक्ट्रिक बसेस आहेत. हे तंत्रज्ञान सुधारत आहे. त्यामुळे मुंबई-पुणे, मुंबई-कोल्हापूर, मुंबई-नागपूर या मार्गावरही येत्या काळात इलेक्ट्रिक बसेस धावतील.
३४० इलेक्ट्रीक बसेस होणार दाखल -
मुंबईसारख्या शहर भागात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी व इंधनाची बचत करण्यासाठी बेस्ट परिवहन विभागाच्या ताफ्यात वातानुकूलित २६ इलेक्ट्रीक बसेस दाखल झाल्या. या बस टाटा मोटर्सने बनवल्या आहेत. बेस्टच्या ताफ्यात यापूर्वी बेस्टच्या मालकीच्या ६ इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल आहेत. तसेच, त्याव्यतिरिक्त भाडे तत्त्वावरील ६६ इलेक्ट्रिक बसगाड्याही दाखल झालेल्या आहेत. एकूण ३४० इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांना प्रदूषणमुक्त प्रवास करायला मिळणार आहे. तसेच, इंधनाची बचत होणार आहे.
प्रवाशांची संख्या -
बेस्टच्या बसमधून एकेकाळी ४३ लाख प्रवासी प्रवास करायचे. वाहतूक कोंडी, शेअर रिक्षा, टॅक्सी, ओला, उबेर यासारख्या वाहतुकीच्या साधनांमुळे बेस्टच्या प्रवाशांची संख्या २८ लाखांवर आली होती. कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यावर अत्यावश्यक सेवेतील अडीच लाख कर्मचारी बसमधून प्रवास करत होते. मुंबईकरांना ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी परवानगी नसल्याने प्रवासासाठी बेस्ट बसचा उपयोग केला जात आहे. यामुळे बेस्टच्या प्रवाशांची संख्या १८ लाखावर पोहचली आहे.
पुणे, नागपूर आणि औरंगाबादेत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी-
पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड विजयी झाले आहेत. तर, औरंगाबाद मतदार संघातून राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. सर्वात आश्चर्यकारक निकाल हा नागपूर मतदारसंघाचा लागला आहे. नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे अभिजित वंजारी मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजपा उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी यांचा पराभव झाला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या ५८ वर्षापासून नागपुरात भाजपाचीच सत्ता होती. तब्बल ५८ वर्षांनी भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडली आहे. भाजपाने प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत नागपूर मतदारसंघात त्यांचा पराभव होणे, हा सर्वात मोठा धक्का आहे.
हेही वाचा-काही आठवड्यांमध्ये उपलब्ध होणार कोरोना लस - पंतप्रधान मोदी
हेही वाचा-सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसीवर असे होतेय काम