मुंबई -राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला बांगड्यांवरुन केलेल्या वक्तव्याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनादरम्यान आझाद मैदानातील भाषणावेळी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही असं म्हटलं होतं. त्याला आता शिवसेनेचे नेते व कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. फडणवीस यांनी याबाबत माफी मागावी अशी मागणी ठाकरे यांनी ट्विटरवर केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी केलेले ट्विट आदित्य म्हणाले, 'देवेंद्र फडणवीसजी, सहसा मी प्रत्युत्तर देत नाही. कृपया बांगड्यांबाबतच्या विधानाबाबत माफी मागा. बांगड्या घालणं हे स्त्री शक्तीची ताकद आहे. राजकारण चालूच राहील, पण ही मानसिकता बदलायला हवी. किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही'.
हेही वाचा -'शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील आम्ही नाही, जशास तसे उत्तर देऊ'
माजी आमदार आणि एमआयएम प्रवक्ते वारिस पठाण यांच्या १०० कोटींविरुद्ध १५ कोटींच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन फडणवीसांनी शिवसेनेला घेरलं होतं. आमचा हिंदू समाज सहिष्णू आहे. मात्र, त्याला आमची दुर्बलता समजून असं कोणी लावारिस बोलत असेल, तर त्याला आम्ही सोडणार नाही. “शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, खरं म्हटलं तर बांगड्या घातल्या हा शब्द आमच्या महिला कार्यकर्त्यांना आवडत नाही आणि म्हणून मी तो वापरणार नाही. मात्र, शिवसेना मूग गिळून बसली असेल मात्र, आम्ही मूग गिळून बसणार नाही”, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं. शिवाजी महाराजांचा अपमान झाला तरी चालेल मात्र आम्ही खुर्ची सोडणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. परंतु, भाजप शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान सहन करणार नाही. कोण आहे तो वारिस की लावारिस? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना माजी मुख्यमंत्र्यांकडून अशा प्रकारची टीका येणं हे अपमानास्पद आहे, असे आदित्य यांनी म्हटले, असून त्यांनी याबाबत जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी ट्विटरवरुन केली आहे.
हेही वाचा -सावरकरांच्या प्रस्तावाबाबत अध्यक्ष योग्य निर्णय घेतील - अजित पवार