मुंबई Aditya Thackeray On CM: आगामी लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध विकासकामांचं भूमिपूजन, लोकार्पण केलं जात आहे. या कामांवरून विरोधक सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आहेत. त्यात आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पालिकेतील प्रशासकीय कमांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. 2021-22 मधील कामे अद्यापही सुरू झाली नाहीत. पालिकेतील भ्रष्टाचारावर आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद घेऊन प्रश्न उपस्थित केला. 'पालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांना आम्ही तुरुंगात टाकू' असा इशाराच आदित्य ठाकरे यांनी प्रशासनासह सरकारला दिला आहे.
पाकीट घेऊन काम करणारे कॉन्ट्रॅक्टर :माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "मागच्या जवळपास वर्षभरापासून आम्ही मुंबईसह राज्यातील रस्त्यांचा विषय सरकार समोर, मुंबई महानगरपालिकेसमोर मांडत आहोत. मुंबईत पाकीट घेऊन काम करणारे एकूण पाच कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यातील एका कॉन्ट्रॅक्टरला टर्मिनेशनची नोट गेली होती. त्या टर्मिनेशन नोटीसची मुदत दोन दिवसांपूर्वी 26 ऑक्टोबरला संपलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे संबंधित कंत्राटदारानं उत्तर दिलेलं नाही. या आठवड्यात महानगरपालिकेमध्ये त्यांची सुनावणी होणार आहे."
खोके घेऊन कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा काम :"महानगरपालिकेत होणाऱ्या या सुनावणीनंतर संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होते, की त्याला पुन्हा एकदा पालिकेची कामं दिली जातात? हे आम्हाला बघायचं आहे. खोके घेऊन या कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा कामं देखील दिली जाऊ शकतात. त्यामुळं या सुनावणीकडं आम्ही सगळेच लक्ष ठेवून आहोत. हा विषय विधानभवनात देखील चर्चेला आला होता. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी एका वर्षात, आम्ही मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करू असं म्हटलं होतं. ही रस्त्यांची कामं एक ऑक्टोबर ते 31 मे या काळात आम्ही पूर्ण करून देऊ, असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र, प्रत्यक्षात अजून एकाही कामाला सुरुवात झालेली नाही."