मुंबई :शहरासह राज्यात अवकाळी पावस आणि बदत्या वातावरणामुळे गेल्या काही दिवसांपासून हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषणात वाढ होत आहे. हवेच्या गुणवत्तेची पातळी धोक्याची घसरली आहे. परिणामी श्वसनाचे विकार जडत आहेत. मुंबईत 24 तास सुरू असलेली बांधकामामुळे धुळीचे थर हवेत पसरत आहे. दुसरीकडे नायट्रोजन डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढू लागले आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव यांना राज्यातील बदलत्या हवा प्रदूषणाबाबत पत्र लिहिले आहे.
पत्रात काय लिहिलंय? : महाराष्ट्रात वायु प्रदूषणाचे संकट घोंगावत आहे. वाढत्या हवा प्रदूषणामुळे राज्यातील नागरिकांच्या आरोग्यावर आणि आयुष्यावर दिवसेंदिवस परिणाम होतो आहे. या आव्हानांना धोरणात्मक पातळीवर तोंड देण्याची गरज आहे. परंतु राज्य आणि केंद्रस्तरावर उपाययोजना दिसून येत नाहीत. महाराष्ट्रात पूर्ण वेळ पर्यावरण मंत्री नसल्याने आणि बेकायदेशीर सरकार असल्याने या समस्यांमध्ये भर पडत चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आपल्याला पत्र व्यवहार केल्याची आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनेची मागणी :मुंबई हवा प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने अभ्यास समिती आणि स्मोग टॉवर्स उभारण्याचा निर्णय घेतला. अर्थसंकल्पात या संदर्भात तरतूद केली. परंतु त्याचा परिणाम होताना दिसून येत नाही. उलट कंत्राटदारांच्या फायद्यासाठीच समिती आणि टॉवर उभारण्यात येत असल्याचे दिसते, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. केंद्र शासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन मुंबईसह राज्यातील हवा प्रदूषणावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.
धूळ नियंत्रणासाठी समिती गठित :मुंबईत सुमारे 5000 पेक्षा अधिक ठिकाणी विविध स्वरूपाची बांधकामे सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात यामुळे धूळ निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर धूळ नियंत्रणासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत केली आहे. सात दिवसाच्या आत ही समिती आपला अहवाल पालिका आयुक्तांना सादर करेल. 1 एप्रिलपासून या अहवालानुसार धूळ नियंत्रण विभागांची अंमलबजावणी काटेकोर पद्धतीने केली जाईल. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी माहिती प्रशासक आणि पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.
हेही वाचा : Hail In North Maharashtra : उत्तर महाराष्ट्राला गारपिटीचा फटका, पिके व फळबागांचे प्रचंड नुकसान