मुंबई - बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत उभारलेल्या आंदोलनाची चर्चा सध्या वरळी मतदारसंघात सुरू आहे. बाळासाहेबांनी दाक्षिणात्य लोकांविरोधात 'उठाव लुंगी, बजाव पुंगी' हे आंदोलन उभारले होते. बाळासाहेबांनी ज्या दाक्षिणात्य लुंगीचा विरोध केला, तीच लुंगी घालून आदित्य ठाकरे यांनी वरळीतील जनतेला मतदान करण्याचे आवाहन केल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केलेली 'लुंगी' नेसून आदित्यचा वरळीत प्रचार हेही वाचा -वाढत्या उन्हात शिवसैनिकांनी स्वतःची काळजी घ्यावी- आदित्य ठाकरे
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबई महाराष्ट्रात राहिली, तरी मुंबईची नाळ ही महाराष्ट्रापासून वेगळी होती. मराठी लोकांसोबतच गुजराती आणि अन्य भाषिकांची संख्याही मुंबईत मोठ्या प्रमाणात वाढत होती. मराठी माणसाला संस्थात्मक पातळीवर एकत्र आणण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसांना पाठिंबा देण्यासाठी दाक्षिणात्य लोकांविरोधात 'उठाव लुंगी, बजाव पुंगी' हे आंदोलन शिवसेनेने केले. यामुळे मराठी भाषिकांची शिवसेना असे समीकरण झाले. पुढे याच शिवसेनेला महापालिका, राज्यात आणि केंद्रात सत्ता स्थापन करता आली.
हेही वाचा -'माझ्यापुढे राजकीय पक्षांचे आव्हान नसून समस्याचे आव्हान आहे'
एकेकाळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाक्षिणात्य लोकांविरुद्ध एल्गार पुकारला होता. मात्र, याला बगल देत आता दाक्षिणात्यांच्या मतांची शिवसेनेला गरज वाटू लागली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे स्वत: लुंगी नेसून मुंबईत असलेल्या दाक्षिणात्यांची मते मागताना दिसत आहेत. याशिवाय, आतापर्यंत मराठी मतांवरच अवलंबून असलेल्या शिवसेनेला गुजराती मते महत्त्वाची वाटू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ वरळी मतदारसंघात लागलेल्या 'केम छो वरली' अशा गुजराती भाषेतील बॅनर्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.
हेही वाचा -शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही, आदित्य ठाकरेंचा भाजपला घरचा आहेर
फक्त गुजरातीच नव्हे तर मराठी व्यतिरिक्त इंग्रजी, उर्दू आणि तेलुगूतील बॅनर्ससुद्धा आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ लावण्यात आले होते. विशेष म्हणजे, एकेकाळी मराठी माणूस आणि मराठी भाषेचा मुद्दा घेऊन स्थापन झालेल्या शिवसेनेने आधी हिंदी आणि गुजरातीसह इतर भाषांमधून प्रचार करायला सुरुवात केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.