मुंबई :एका बाजूला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. तर, दुसरीकडे कोरोना काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ठाकरेंना कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात आहे. मागची अनेक वर्ष बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता होती. याच मुद्द्यावर भाजप शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातच मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे कार्यालय पालिकेत सुरू झाल्यानंतर मोठा वाद सुरू आहे. पालिकेतील अनेक कामांची सध्या चौकशी सुरू आहे. त्यातच आता मिठी नदीच्या कामाची देखील SIT चौकशी होणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली आहे.
कॉन्ट्रॅक्टरसाठीच लोढांचे कार्यालय : मंगल प्रभात लोढा यांचे पालिकेत कार्यालय सुरू झाल्यानंतर त्या कार्यालयात भाजपचे माजी नगरसेवक बसून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, "बृहन्मुंबईच्या मुख्यालयात पालक मंत्र्यांचे कार्यालय सुरू करून आता तिथे भाजपचे माजी नगरसेवक बसून काम करत आहेत. त्यांनी बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरचे कामे करण्यासाठीच ते कार्यालय सुरू केले आहे." असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
मिठी नदीच्या कामाची SIT चौकशी :पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या काळात मीसुध्दा मुंबईचा पालकमंत्री होतो. पण, मी तिथे स्वतंत्र कार्यालय सुरू केले नाही. आम्ही बैठका आयुक्तांच्या दालनात घेत होतो. तिथे चर्चा होत होत्या. ही हुकूमशाही मुंबईसाठी, मुंबईच्या विकासासाठी धोक्याची आहे. आधीच पालिकेच्या कामांच्या इतक्या चौकशा सुरू आहे. त्यात आता मिठी नदीच्या कामाची SIT चौकशी होणार आहे. पण, यांनी अशीच चौकशी मणिपूर संदर्भात पण लावायला हवी." असा टोला आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.
देशात हुकूमशाही सुरू :"एका माजी सैनिकाच्या पत्नीला जाळले, महिलांवर गँग रेप झाला. खरे तर याची चौकशी झाली पाहिजे. आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांना निलंबित केले. का तर, त्यांनी मणिपूर संदर्भात चौकशीची मागणी केली म्हणून. देशात हुकूमशाही सुरू आहे. त्याविरोधात आम्ही इंडिया म्हणून लढत आहोत. आपल्याकडे एक मंत्री आहेत. त्यांचे नाव फुलासारखे आहे. मात्र, ते काट्यासारखे वागत आहेत. भाजप आमदार देवयानी फरांदे यांना बोलू दिले जात नाही. आता याला जनता उत्तर देईल." असे उत्तर आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.
हेही वाचा -Aditya Thackeray Criticizes Shinde : ना खाती, ना इज्जत! आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल....