मुंबई ED Arrest Suraj Chavan : कोविड काळात BMC मधील खिचडी घोटाळा प्रकरणात आरोप असलेले सूरज चव्हाण यांना ईडीनं अटक केली आहे. कोविड काळात मुंबई महापालिकेत 132 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला होता. सूरज चव्हाण यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी सूरज चव्हाण यांची चौकशी सुरू होती. मात्र, आज अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) त्यांना अटक केली आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. किरीट सोमैया यांच्या आरोपानंतर काही महिन्यांपूर्वी ईडीनं मुंबईत सात ठिकाणी छापे टाकले होते. पालिका अधिकाऱ्यांसह सूरज चव्हाण यांच्या घरावर देखील छापा टाकण्यात आला होता.
ईडी करणार कोठडीची मागणी : खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांची यापूर्वी ईडीनं चौकशी केली होती. सूरज चव्हाण यांना उद्या विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केलं जाणार असून ईडी कोठडीची मागणी करणार आहे. आता उद्या पीएमएलए कोर्टात ईडी काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल. काल शिवसेना ठाकरे गटानं आयोजित केलेल्या जनता न्यायालय कार्यक्रमाला सूरज चव्हाण यांची उपस्थिती होती.
काय म्हणाले किरीटसोमैया? :भाजपा नेते तथा माजी खासदार किरीट सोमैया यांनीही सूरज चव्हाण यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. "ईडीनं कोविड लॉकडाऊन खिचडी घोटाळ्यात आदित्य ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना अटक केली आहे. मी त्याचं स्वागत करतो. खिचडीचे पैसे संजय राऊत यांच्या मित्राच्या कुटुंबाच्या खात्यात गेले. उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी ऑक्सिजन खाल्ला, कोविड कफन खाल्लं, रेमडेसिवीर खाल्लं, खिचडी खाल्ली. या घोटाळ्याचा उद्धव ठाकरे यांना हिशेब द्यावाच लागेल," असं किरीट सोमैया यांनी म्हटंल आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांची चौकशी : खिचडी घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी चौकशी केली होती. खिचडी घोटाळा प्रकरणात संदीप राऊत यांनाही पैसे मिळाल्याचा आरोप आहे. खिचडी घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण तसंच संजय राऊत यांचे निकटवर्ती सुचित पाटकर यांचीही चौकशी करण्यात आली होती. गेल्यावर्षी जुलै महिन्यात सुजित पाटकर, सुरज चव्हाण यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीनं समन्स बजावून सुरज चव्हाण यांना चौकशीसाठी नोव्हेंबर महिन्यात बोलावलं होतं. त्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्यात सूरज चव्हाण यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली होती. 6.67 कोटींचा हा खिचडी घोटाळा असून त्याचा तपास ईडी करत आहे. त्याचप्रमाणे ईडीकडून मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची देखील चौकशी करण्यात आली होती.
हेही वाचा -
- बावनकुळे स्पष्टच बोलले, सुशीलकुमार शिंदेंना भाजपाने कसलीही ऑफर दिली नाही
- मुख्यमंत्र्यांनी दावोसला दलाल नेले; मुख्यमंत्री शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका
- महायुती सरकारचा अँम्ब्युलन्स घोटाळा, 8 हजार कोटी कंत्राटदाराच्या घशात - वडेट्टीवार