मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर शहीद भारतीय सैन्याच्या नावे मते मागितली. त्यामुळे आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मोदींवरील कारवाईसाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतिक्षा असल्याची माहिती अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.
उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील औसा येथील लोकसभा प्रचाराच्या जाहीर सभेत मोदी यांनी भाजप-शिवसेना युतीला मतदान करण्याचे आवाहन केले होते. 'आपका पहिला वोट पाकिस्तान के बालाकोट मे एअर स्ट्राईक करनेवाले वीर जवानो के नाम समर्पित हो सकता है क्या? आप का पहिला वोट पुलवामा मे जो वीर शहिद हुए है, उन वीर शहीदों के नाम समर्पित हो सकता है क्या?' असे मोदी प्रचार सभेत म्हणाले होते. त्यामुळे भारतीय जवानांच्या, सैन्याच्या नावावर मतदान मागितले. मोदींनी सैन्याच्या नावावर राजकारण केले असल्याचा आरोप अनेक स्तरावरून होत होता.
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कारवाई करून गुन्हा नोंद करावा. तसेच त्यांच्यावर प्रचारबंदी घालण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे. एवढेच नाहीतर निवडणुक आयोगाने सैनिकांचा किंवा लष्कराचा वापर प्रचारात करू नका, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, मोदींनी बालाकोटमधील हवाई हल्ल्यासंदर्भात मते मागण्यासाठी केलेले विधान सकृतदर्शनी आचारसंहितेचा भंग आहे, असे उस्मानाबाद जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.