मुंबई - मागील काही दिवसांपासून नाना पाटेकर यांना तनुश्री दत्ता प्रकरणी क्लीन चिट मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध होत आहे. या सर्व बातम्या केवळ अफवा असून नाना पाटेकर यांना कोणतीही क्लीन चिट मिळाली नसल्याचे तनुश्री दत्ता प्रकरणाचे काम पाहणारे वकील नितीन सातपुते यांनी स्पष्ट केले आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांनी 'हॉर्न ओके प्लिज' या सिनेमाच्या सेटवर आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप केला होता. त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. आता जवळजवळ ७ महिन्यांनंतर पोलिसांनी ठोस पुराव्या अभावी नानांना क्लिनचीट मिळाल्याचे वृत्त समोर आले होते.
तनुश्री दत्ता प्रकरणी नाना पाटकरांना कोणतीही क्लीन चिट नाही - अॅड. नितीन सातपुते क्लीन चीट मिळण्यासाठी एका प्रक्रियेतून जावे लागते. सीआरपीसी मध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करून ते कोर्टात सादर करावे लागतात. जर पुरावे नसतील तर ती डीसमरी रिपोर्टनुसार फिर्यादीला बोलावून त्यांचे म्हणणे एकूण अशा प्रकारणात निकाल देण्यात येतो. या प्रकरणात असे कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे नानांना क्लीन चिट मिळाल्याच्या बातम्या बनावट असल्याचे सातपुते यांनी सांगितले आहे.
यावर तनुश्री दत्तानेही या निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. नाना पाटेकरांची टीम अशा बातम्या पसरवत असल्याचे नितीन सातपुते यांनी म्हटले आहे. तर याची दखल घेऊन आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहोत. जेणेकरून हा तपास बाधित होता कामा नाही, असेही ते यावेळी म्हणाले. या केसमध्ये १० ते १५ साक्षीदार तपासले आहेत. जे महत्त्वाचे साक्षीदार आहेत, जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत त्यांचे पोलिसांनी जबाब नोंद केले नाही. त्यामुळे नाना पाटेकर यांच्याकडून साक्षीदारांवर दबाव येत आहे. नाना पाटेकर यांच्यातर्फे साक्षीदाराशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे साक्षीदार पुढे येऊन साक्ष देण्यास घाबरत आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया लांबत चालली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.