मुंबई Actress Tejaswini Pandit Tweet : राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना टोल नाक्यावर अडवल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा टोल नाके विरुद्ध मनसे असा वाद सुरू झाला. त्यानंतर सरकारने टोल दरात वाढ जाहीर केली. मग या दरवाढी विरोधात मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव हे उपोषणाला बसले. राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्यास सांगितलं. आज राज ठाकरे यांनी 'सरकारने आपली भूमिका जाहीर करावी. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यानुसार महाराष्ट्रात टोल नाक्यांवर चार चाकी वाहनांना अडवलं जात आहे का? हे मनसेचे कार्यकर्ते पाहतील आणि इथे जर दमदाटी होत असेल तर माझे कार्यकर्ते टोलनाके जाळतील' असं वक्तव्य केलं. त्यानंतर या वादात आता अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने उडी घेतली आहे.
टोलनाक्यांवर चार चाकी वाहनांना मोफत प्रवेश? -सरकारने टोल दरात वाढ केली म्हणून अविनाश जाधव यांनी उपोषण सुरू केलंय. त्यांचे उपोषण सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाराष्ट्र राज्य शासनाच्या अखत्यारीमध्ये जे काही टोलनाके येतात त्या टोलनाक्यांवर चार चाकी वाहनांना मोफत प्रवेश' असल्याचं म्हटलं. सध्या सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने देखील हा व्हिडिओवर ट्विट केलाय. "म्हणजे? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून! हे "माननीय उपमुख्यमंत्री" यांचे विधान कसे असू शकते? अविश्वसनीय! तुमचीही फसवणूक झाली असेल तर शेअर करा!" अशा आशयाचे हे ट्विट आहे.