मुंबई: पद्मश्री तसंच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे रविवारी (4 जून) निधन झाले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी मुंबई येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुलोचना श्वसनाशी संबंधित संसर्गाने आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते.
श्वसनाच्या आजाराने होत्या ग्रस्त - मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात सुलोचना लाटकर यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
सोमवारी होणार अंत्यसंस्कार - सुलोचना लाटकर यांच्या पार्थिवावर सोमवार (5 जून) शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी प्रभादेवी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. 3 जून रोजी सुलोचना यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर 3 जूनपासूनच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मार्च महिन्यातही सुलोचना यांची तब्येत बिघडली होती.
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार - मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी लाटकर यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. दादर स्मशानभूमी सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. तत्पूर्वी प्रभादेवी येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
आई घराघरात पोहचली - मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या सुलोचना दीदी लाटकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून शोक भावना व्यक्त केल्या जात आहेत. मोलकरीण या चित्रपटातून त्यांनी साकारलेले आईची भूमिका घराघरात पोहोचली. त्यानंतर त्या आई नावाने नावारूपास आल्या. जवळपास सात दशकांच्या आपल्या कारकिर्दीत सुलोचना दीदींनी 250 हिंदी आणि 50 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी आपल्या व्यक्तिरेखांनी विशेषतः 'आई'च्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. दोन्ही चित्रपट सृष्टीतील अनेक कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या जशा पडद्यावर प्रेमळ, सोशिक दिसतं, तश्याच त्या अनेकांसाठी मायेचा आधार होत्या. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे. त्यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीतील अनेकांना पोरकेपणाची भावना निर्माण झाली असेल. काळाने त्यांना आपल्यातून ओढून नेल्याने आपण एक चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी "आई' गमावली आहे, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना आणि चित्रपट सृष्टीतील स्नेह्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी ही प्रार्थना - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सुलोचना लाटकर यांचे चित्रपट जग - सुलोचना लाटकर यांनी 1943 पासून भालजी पेंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर एका मागून एक असे अनेक चित्रपटातून ओळख निर्माण केली. त्यांच्या कारकिर्दीत आईच्या भूमिकेसाठी विशेष ओळख मिळाली. त्यांना चित्रभूषण आणि महाराष्ट्र भूषन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अब दिल्ली दूर नही, कटी पतंग, संपूर्ण रामायण, मराठा तितुका मेळवावा अशा अनके चित्रपटात त्यांनी अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.
सुलोचना लाटकर यांचा अल्प परिचय - सुलोचना लाटकर यांनी मुख्य अभिनेत्रीपासून ते व्यक्तिरेखेपर्यंत ५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. दुसरीकडे, हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे तर सुलोचना लाटकर या 250 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसल्या. एक अभिनेत्री म्हणून, सुलोचना यांनी 40 च्या दशकात मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाच्या जगात प्रवेश केला आणि अनेक हिट मराठी चित्रपट दिले. मराठी चित्रपटसृष्टी गाजवल्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले, जिथे प्रेक्षकांना त्यांची भूमिका खूप आवडली.
मराठीह हिंदी सिनेमातही केले काम - सुलोचना यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका केल्या, पण नंतर हिंदी चित्रपटात 'आई'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणून सुलोचना यांना ओळख मिळाली. सुलोचना यांना बॉलीवूड मेगास्टार्स अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची ऑनस्क्रीन आई म्हणूनही ओळखले जात होते. या दोन्ही सुपरस्टारच्या अनेक चित्रपटांमध्ये ती आईच्या भूमिकेत दिसली होती.
हेही वाचा -अभिनेत्री सुलोचना लाटकर दादासाहेब फाळके पुरस्कारापासून वंचित का?