मुंबई :मुंबईबाबत वादग्रस्त विधान करणारी सिनेअभिनेत्री कंगना रणौत हिच्या कार्यालयातील बेकायदेशीर बांधकाम मुंबई महापालिकेने तोडले आहे. यावरून कंगना आणि सत्ताधारी शिवसेनेत वाक्-युद्धही रंगले. याच पार्श्वभूमीवर कंगनाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेतली. या भेटीदरम्यान कंगनाने आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत राज्यपालांकडून न्यायाची अपेक्षा केली. कंगनाची ही राज्यपाल भेट म्हणजे शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दबावतंत्र : अभिनेत्री कंगना रणौतने घेतली राज्यपालांची भेट - kangana ranaut governor visit news
अभिनेत्री कंगना रणौतने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनवर भेट घेतली. या भेटीदरम्यान कंगनाने कार्यालयावर मुंबई पालिकेने केलेल्या कारवाईविरोधात चर्चा करत आपली बाजू मांडली. ही भेट म्हणजे दबावतंत्राचा भाग असल्याची चर्चा आहे.
'ही मुंबई आहे की पाकिस्तान व्याप्त काश्मीर', मी मुंबईत येत आहे कोणाच्या बापात दम असेल तर मला रोखून दाखवावे, असे वक्तव्य कंगना रणौतने केले होते. त्यानंतर पालिकेने वांद्रे पाली हिल येथील मणिकर्णिका प्रॉडक्शन हाऊसच्या कार्यालयात बेकायदेशीर बांधकाम केल्याची नोटीस दिली होती. या नोटीसला कंगनाच्या वकिलांनी उत्तर दिले होते मात्र, पालिकेचे समाधान झाले नसल्याने पालिकेने बेकायदेशीर बांधकाम तोडले आहे.
यावरून कंगनाने मुंबई पालिकेत आणि राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेला टार्गेट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही एकेरी भाषेत उल्लेख केला होता. यावरून मुंबईत आणि राज्यात राजकारण पेटले असताना आज कंगनाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आपल्यावर कशाप्रकारे अन्याय झाला याची माहिती कंगनाने राज्यपालांना दिली. तसेच आपल्याला नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केल्याची माहिती मिळत आहे. कंगनाची ही राज्यपाल भेट मुंबई पालिकेत आणि राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेवर दाबावतंत्राचा एक भाग असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.