मुंबई -उद्योगपती राज कुंद्राच्या कंपनीच्या तीन-चार निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एक नाव अभिनेत्री गहना वशिष्ट हिचे देखील आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपासादरम्यान, आता आरोपींमध्ये गहनाचे नाव समोर आले आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने पोर्नोग्राफी प्रकरणाची सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली आहे.
समन्स मिळाल्यानंतर वैतागली गहना -
अश्लिल चित्रपट प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला समन्स बजावले आहे. क्राईम ब्रँचने समन्स बजावल्यानंतर गहनाने सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहून वारंवार होत असलेल्या चौकशीच्या फेऱ्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. गहना म्हणते मी म्हणजे काही चालता बोलता कंप्युटर नाही.
गहनाला पोलीस स्टेशनमध्ये रविवारी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ती हजर झाली नव्हती. मुंबईच्या बाहेर असल्यामुळे हजर होण्यास उशीर लागत असल्याचे तिने म्हटले होते. सोमवारी गहनाने यावर एक दीर्घ पोस्ट लिहिली आहे. यात तिने म्हटले, पहिल्यांदा मी 14 दिवसांच्या पोलीस कस्टडीमध्ये होते. त्यानंतर आठ दिवस मालवणी पोलिसांसोबत होते. सीआयडी, डीसीबी टीमने माझे तिनही फोन, लॅपटॉप, सर्व अकाऊंट्स, पासवर्ड घेतले. मला माहिती असलेली सर्व गोष्टी मी त्यांना सांगितल्या. त्याला आता सहा महिने झाले. माहितीची शहानिशा करण्यासाठी त्यांच्याकडे उत्तम फॉरेन्सीक टीम आहे. मग अजून काय विचारायचे राहिलंय.