मुंबई :सतीश कौशिक हे गुडगाव येथील एका फार्महाऊसवर परिचित व्यक्तीला भेटण्यासाठी गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार तेथून परतत असताना सतीश कौशिक यांना कारमध्येच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने गुडगावच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला आहे. अभिनेते सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याबरोबरच अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन ही केले आहे. सतीश कौशिक यांच्या निधनाने बॉलिवूडवर मोठी शोककळा पसरली आहे.
अल्प परिचय : सतीशचंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणा येथे झाला होता. सतीश हे लहानाचे मोठे नवीवाला गली, करोलबाग, दिल्ली येथे झाले, नंतर पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यात त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला. नवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांनी अभिनयाचे धडे घेतले. त्यानंतर मुंबईत आल्यावर सतीश कौशिक यांनी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता व स्क्रिप्ट राईटर म्हणून फार मोठे नावलौकिक कमावले. सतीश कौशिक यांच्या पश्चात त्यांची पत्नी शशी व वंशिका ही मुलगी आहे.
मुंबईत होणार अंत्यसंस्कार :अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. सध्या दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात अभिनेते सतीश कौशिक यांचे पार्थिव ठेवण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाईल.त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यानंतर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. फिल्म अभिनेते व सतीश कौशिक यांचे मित्र अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी सर्वात अगोदर ट्विट करून दिली. ओम शांती' असं म्हणत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री कंगना रनौतनं ट्विटरवर सतीश यांच्यासोबतचा एक फोटो शेअर सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.