मुंबई - आपल्या अभिनय कारकिर्दीत विविध प्रकारच्या पण प्रामुख्याने विनोदी खलनायकाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झालेले चरित्र अभिनेता रवींद्र बेर्डे यांच मुंबईत निधन झालं. बऱ्याच वर्षांपासून असलेल्या कर्करोगावर मात करण्यासाठी त्यांची झुंज सुरू होती. या आजारावर मात करण्यापूर्वीच त्यांना अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रवींद्र बेर्डे हे लोकप्रिय अभिनेता दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. तर त्यांचे चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे हे लेखक, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक आहेत. गेल्या काही वर्षांपासून रवींद्र बेर्डे हे मनोरंजन क्षेत्रापासून दूर राहिले आहेत. त्यांच्या निधनानं मराठी चित्रपटीसृष्टीतील कलाकार शोक व्यक्त करत आहेत.
नभोवाणी ते चित्रपटापर्यंत असा राहिला प्रवास-वयाच्या विसाव्या वर्षी रवींद्र बेर्डे यांनी नभोवाणीतून काम करण्यास सुरुवात केली. नभोवाणीत २४ वर्षे सेवा केल्यानंतर त्यांना नाटक, चित्रपटाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. रवींद्र बेर्डे यांनी १९८७ मध्ये नाटकापासून मनोरंजन क्षेत्रातील कारकीर्द सुरू केली. नाटकातील त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं. या यशानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी ३१ नाटकातून विविध भूमिका करत मराठी रंगभूमीला मोलाचं योगदान दिलं. रंगभूमीबरोबरच रवींद्र बेर्डे यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही स्वतःच्या अभिनयाची छाप सोडली. एकाचवेळी खलनायक आणि विनोदी भूमिका साकारताना त्यांनी मराठी चित्रपटात आपल्या भूमिकांनी प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवलं. विनोदी चित्रपटांमध्ये नायिकेचा रागीट पित्याची भूमिका असो की खलनायक त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना नेहमीच पसंत पडल्याचं दिसून आलं.
या चित्रपटांत केले होते काम-हमाल दे धमाल, थरथराट, धडाकेबाज, झपाटलेला या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका उल्लेखनीय ठरल्या. १९९५ साली त्यांना 'व्यक्ती आणि वल्ली' नाटकात ते काम करत असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. तर २०११ मध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचं निदान झालं. मात्र, कलेवरील प्रेमानं त्यांना संकटावर मात करण्याकरिता जिद्द मिळाली. त्यांनी ३०० हून अधिक मराठी चित्रपट आणि ५ हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. नायक द रिअल हिरो, सिंघम आणि हम दो अनजाने या हिंदी चित्रपटातदेखील त्यांनी भूमिका केल्या आहेत.
- नुकतेच ज्युनिअर मेहमूद यांचं कर्करोगानं निधन झालं. त्यातच मराठी चित्रपटसृष्टीतील चरित्र अभिनेते बेर्डे यांची प्राणज्योत मालवली. गेल्या आठ दिवसात दोन विनोदी अभिनेत्यांचं निधन झाल्यानं चाहते सोशल मीडियावर दु:ख व्यक्त करत आहेत.
हेही वाचा-
- अभिनयानं हसविणारे ज्युनिअर मेहमूद प्रेक्षकांना गेले रडवून! मुंबईत उपचार सुरू असताना निधन