मुंबई: बॉलिवूड अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या पत्नीच्या वाद प्रकरणी महत्वाची माहिती समोर आली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या विभक्त पत्नी आलिया सिद्दीकीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, माझ्या दोन मुलांना हाकलून देण्यात आले आहे. तसेच त्यांना आर्थिक मदत मिळत नसल्याचे देखील तिने सांगितले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने नवाजुद्दीन सिद्दकीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहे. तसेच याप्रकरणातील पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.
सुनावणी दरम्यान काय झाले?: आलिया सिद्दीकीचे वकिल अॅड. रिजवान सिद्दीकी यांनी न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि पीडी नाईक यांच्या खंडपीठाला सांगितले की, विभक्त जोडप्यामधील परिस्थिती प्रतिकूल होती. खंडपीठ नवाजुद्दीन सिद्दीकीने दाखल केलेल्या एका हेबियस कॉर्पस (व्यक्तीला तयार करा) याचिकेवर सुनावणी करत होता, ज्यामध्ये त्याच्या परक्या पत्नीला आपल्या मुलांना न्यायालयात हजर करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी त्यांनी मागणी केली आहे.
नवाजुद्दीन सिद्दकीने केला होता दावा: नवाजुद्दीन सिद्दकीने असा दावा केला होता की त्याच्या पत्नीने मुलांना न सांगता दुबईहून भारतात आणले होते आणि स्थान बदलल्याने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता कारण ते शाळेत जात नव्हते. नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी मुलांसोबत मुंबईत तिच्या सासूच्या घरी राहत होती. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने या दोघांना त्यांच्या मुलांशी संबंधित समस्या सौहार्दपूर्णपणे सोडवण्याची सूचना केली होती. तसेच पत्नीकडून त्यांच्या शिक्षणाबद्दल जाणून घेण्यास सांगितले होते.