मुंबई :मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या आई सरोज अंबर कोठारे यांचे निधन झाले आहे. त्या ९३ वर्षांच्या होत्या. महेश कोठारे यांचे पुत्र आणि अभिनेते आदिनाथ कोठारे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
निधनाने कुटुंबाला धक्का :जानेवारी महिन्यात महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. आता सहा महिन्यांनंतर सरोज कोठारे यांच्या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अंबर कोठारे यांच्या पश्चात मुलगा व प्रसिद्ध निर्माता - दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. 'स्व. सौ. सरोज अंबर कोठारे यांना संपूर्ण कोठारे कुटुंबाकडून भावपूर्ण श्रद्धांजली. तुमच्या आत्म्याला शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना,' अशी पोस्ट आदिनाथ कोठारे यांनी केली आहे. आदिनाथ कोठारे यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करून सरोज कोठारे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अंबर कोठारे यांचे जानेवारीत निधन -महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे जानेवारीत निधन झाले. त्यांच्या निधनानंतर उर्मिला कोठारे यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, 'स्व. श्री. अंबर कोठारे (१४.०४.१९२६ - २१.०१.२०२३) - संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.' हीच पोस्ट महेश कोठारे यांनीही शेअर केली होती. निधनाची बातमी कळताच अनेकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. महेश कोठारेंच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये रंगकर्मी, सहकलाकार, निर्माते, दिग्दर्शकांसह चाहते आपल्या सहवेदना व्यक्त केल्या. महेश कोठारेंच्या यशासाठी सतत धडपडणारा एक सच्चा कलावंत हरपल्याची भावना व्यक्त होत होती.
महेश कोठारेंच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा - महेश कोठारे यांच्या बालकलाकार ते निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून झालेल्या जडणघडणीत त्यांचे वडिल अंबर कोठारे यांच्या बरोबरच त्यांची आणि सरोज कोठारे यांचेही मोलाचे योगदान होते. महेश कोठारे यांची निर्मिती-दिग्दर्शन क्षेत्रामधील पदार्पण असलेला धुमधडाका हा चित्रपट यशस्वी करण्यात व त्याच्या निर्मितीत त्यांच्या वडिलांच्या बरोबरच आईनेही हातभार लावला होता. सहा-सात महिन्यात कोठारे कुटुंबावर हा दुसरा आघात झाल्याने त्यांना चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्याकडून सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत. तसेच सरोज कोठारे यांना श्रद्धांजली वाहन्यात येत आहे.
हेही वाचा -Actor Ravindra Mahajani : राजबिंडा अभिनेता रविंद्र महाजनी पंचत्वात विलीन, पुण्यात अंत्यसंस्कार