मुंबई - KRK arrested at airport : अभिनेता कमाल आर खानला सोमवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका जुन्या तक्रारीबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काही महिला कलाकार आणि मॉडेल्सच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी त्यांच्यावर एक जुनी केस प्रलंबित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला वर्सोवा पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि त्याला जाण्याआधी नोटीस बजावण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 2016 च्या प्रकरणात वर्सोवा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या लुकआउट परिपत्रकाच्या (LOC) आधारावर कमाल आर खानला ट्विटरवर (आता X) डझनहून अधिक अभिनेत्री आणि मॉडेल्स विरुद्ध अश्लील आणि असभ्य मजकूर पोस्ट केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. "कमाल आर खानला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याला नोटीस बजावल्यानंतर त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली," असे अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले.
दुबईला जात असताना केआरकेला अटक
केआरकेने त्याच्या X (ट्विटर) अकाऊंटवर लिहिले आहे की, “मी गेल्या एक वर्षापासून मुंबईत राहात आहे. मी माझ्या कोर्टाच्या तारखाांसाठी नियमितपणे हजर राहतो. आज मी नवीन वर्षासाठी दुबईला जाणार होतो. पण मुंबई पोलिसांनी मला विमानतळावर ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016 च्या एका गुन्ह्यात मी त्यांना हवा आहे. माझ्यामुळे त्याचा 'टायगर 3' हा चित्रपट फ्लॉप झाल्याचं सलमान खान म्हणत असतो. कोणत्याही परिस्थितीत माझा मृत्यू जर पोलीस ठाण्यात किंवा तुरुंगात झाला तर तो खून आहे हे तुम्हाला समजायला हवे आणि याला जबाबदार कोण आहे हे तुम्हा सर्वांना माहित असले पाहिजे.''