मुंबई -केंद्र सरकारने लागू केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याला आणि एनआरसी कायद्याला विरोध करण्यासाठी निघालेल्या मोर्चात वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिक आवर्जून उपस्थित राहिले. यात बॉलिवूड सेलिब्रिटींचा सहभागही लक्षणीय होता. भारतीय लोकशाहीचा योग्य सन्मान राखायचा असेल तर हा कायदा जायलाच हवा, असे मत अभिनेता जिम सरभ याने ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले.
अभिनेता जिम सरभसोबत विराज मुळे यांनी केलेली बातचीत 'पद्मावत' आणि 'संजू' या सारख्या सुपरहिट सिनेमात काम केलेला अभिनेता जिम सरभ हादेखील या आंदोलनात एखाद्या सर्वसामान्य आंदोलनकर्त्याप्रमाणे सहभागी झाला होता. एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायदा हे दोन्ही कायदे भारतीय लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारे कायदे असल्याने ते त्वरित मागे घ्यायला हवेत, अशी मागणी यावेळी जिमने केली.
कोणत्याही धर्माच्या नावाने मोजक्याच देशातील लोकांना नागरिकत्व देणं हे पूर्णपणे गैर आहे. पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान मधील मुस्लिम वगळता सगळ्यांना नागरिकत्व देताना म्यानमार आणि श्रीलंका या दोन शेजारी देशावर आपण अन्याय करत आहोत. त्याशिवाय सुधारित नागरिकत्व कायद्यानुसार फक्त कागदपत्र नाहीत म्हणून वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या देशात राहणाऱ्या लोकांना देशाबाहेर काढणं गैर असल्याचं मत त्याने व्यक्त केलं आहे.
देशातील विद्यमान सरकार आधीच गुजरात दंगल, झुंडबळी, आर्टिकल 370 काढल्यानंतर झालेला हिंसाचार, इंटरनेट आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वारंवार करण्यात आलेले हल्ले यामुळे आधीच बदनाम आहे. अशात माणसा माणसात फूट पडणारे कायदे करणाऱ्या या सरकारचा करावा तेव्हढा निषेध कमीच आहे, असे मत जिमने व्यक्त केले आहे.