मुंबई - निवडणुका जवळ आल्या की नेहमीच चर्चीला जाणारा विषय म्हणजे महिलांचा राजकारणातील सहभाग. सध्या राज्याच्या विधानसभेत २१ महिला या आमदार आहेत. दोन पातळ्यांवर महिलांच्या सहभाग बघितला जातो. एक म्हणजे निवडणूक लढवणे आणि दुसरे मतदान प्रक्रियेत सहभागी होणे. यावेळीही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक महिला राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी महिला प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणत्या महिला नेत्या लक्ष वेधणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पाहुया प्रचारात सक्रिय असणाऱ्या राज्यातील महिला...
सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या असणाऱ्या आणि सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या राज्यातील विधानसभेचा प्रचार करत आहेत. त्या प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या गावोगावी भेटी गाठी देत आहेत. सुप्रिया सुळे या सलग ३ वेळेस लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत.
पंकजा मुंडे
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि राज्याच्या महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे याही प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. त्या सध्या परळी विधानसभेच्या आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनीही तयारीला सुरुवात केली असून, मतदारसंघात त्यांच्या प्रचारसभा सुरु आहेत. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना रंगण्याची चिन्ह दिसत आहेत.
निलम गोऱ्हे
शिवसेनेचा एक प्रमुख चेहरा म्हणून आमदार निलम गोऱ्हे यांना ओळखले जाते. सातत्याने ते अगदी भक्कमपणे पक्षाची बाजू मांडत असतात. सध्या त्या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत.
प्रणिती शिंदे
देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या विधानसभेच्या तयारीला लागल्या आहेत. त्यांनीही आपल्या मतदारसंघात प्रचार यात्रा सुरु केली आहे. प्रणिती शिंदे या सोलापूर मध्यच्या आमदार आहेत. सध्या काँग्रेसची गळती आणि त्यामुळे मतदारसंघात बदलेले चित्र यामध्ये प्रणिती शिंदे यांच्यासमोर निवडूण येण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
यशोमती ठाकूर
अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघाच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर या विदर्भातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा आहेत. त्यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रताराला सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या एक आक्रमक नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.