मुंबई- मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मास्क लावा, रस्त्यावर थुंकू नका, असे आवाहन महापालिकेकडून वारंवार केले जात आहे. मात्र, त्यानंतरही 60 ते 70 टक्के मुंबईकर मास्क वापरताना दिसत नाहीत. या मुंबईकरांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेने मुंबई आणि वाहतूक पोलिसांचीही मदत घेतली आहे. त्यानंतर आता पालिका आयुक्तांच्या आदेशाने मास्क ना लावणाऱ्यांविरोधातील कारवाई कडक करण्यासाठी महापालिकेने क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली आहे.
मुंबईमध्ये मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने मास्क वापरा, हात वारंवार धुवा, गर्दीत जाण्याचे टाळा, कोरोनाची लक्षणे नसल्यास त्वरित उपचार करून घ्या, असे आवाहन पालिकेने केले आहे. मुंबईकरांना मास्क लावण्याची सवय लावता यावी म्हणून पालिकेने मास्क न लावल्यास एक हजार रुपये दंड बसवला होता. टाळेबंदीनंतर मिशन बिगिन अंतर्गत मुंबईमधील व्यवहार टप्प्याटप्याने सुरू केले जात आहेत. यामुळे पालिकेने दंडाची रक्कम कमी करत 200 रुपये इतकी केली आहे. महापालिकेने आतापर्यंत 40 हजार नागरिकांवर कारवाई करत 1 कोटी 5 लाख रुपये इतका दंड वसूल केला आहे.
नुकतीच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईच्या काही विभागात भेट दिली. या भेटी दरम्यान 60 ते 70 टक्के मुंबईकर आजही मास्क वापरत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे पालिकेने दंडाची रक्कम दुप्पट म्हणजेच 400 रुपये इतकी करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क न लावणाऱ्यांविरोधात दंड वसूल करण्यासाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांची मदत घेतली जात आहे. मुंबईकरांना वारंवार आवाहन करूनही मास्क वापरले जात नसल्याने महापालिकेने आता क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली आहे. मुंबईच्या 24 विभाग कार्यालयाला दिलेल्या आदेशानुसार 500 हून अधिक क्लीनअप मार्शल मुंबईत नियुक्त करण्यात आले आहेत.
जनजागृती आणि कारवाई
मुंबई महापालिका कर्मचारी आणि क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून मास्क लावण्याबाबत जनजागृती केली जात आहे. जे नागरिक मास्क वापरत नाहीत, अशा नागरिकांकडून दंड वसूल केला जात आहे. मुंबई महापालिकेच्या 24 विभाग कार्यालयांना पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मास्क ना लावणाऱ्याविरोधात कारवाई कडक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईत 500 पेक्षा अधिक क्लीनअप मार्शल नियुक्त केले आहेत, अशी माहिती पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी असलेल्या अशोक यमगर यांनी दिली.
मुंबईत पहिला गुन्हा दाखल