मुंबई - लोकल मार्गावरील अस्वच्छता, रुळांवर जमा होणारा कचरा नेहमीच रेल्वेसमोर आव्हान ठरते. त्यामुळे, रेल्वेला मोठ्या समस्यांना समोर जावे लागते. आता रेल्वे मार्गावर कचरा फेकणाऱ्यांविरोधात रेल्वेकडून कारवाई केली जात आहे. तसेच, रेल्वे मार्गालगत राहणाऱ्या रहिवाशांना रेल्वे प्रशासनाकडून नोटीस पाठविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नोटीस पाठवून देखील याचे पालन न केल्यास त्यांच्यावर भारतीय रेल्वे कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिली.
हेही वाचा -महाराष्ट्र कोरोना अपडेट : रुग्ण संख्येत वाढ; मंगळवारी 3663 नवीन रुग्ण, 39 मृत्यू
650 नागरिकांना बजावणार नोटीस
रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे मार्गावरील कचरा आणि नाले साफ करण्यात येते. या सफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च रेल्वे प्रशासनाकडून केला जातो. मात्र, सफाई झाल्यास काही महिन्यांमध्ये परिस्थिती 'जैसे थे' होते. त्यामुळे, रेल्वे मार्गालगत राहणाऱ्या नागरिकांना अनेकदा रेल्वे रुळावर किंवा नाल्यात कचरा न टाकण्याचे आवाहन केले होते. तसेच, रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. त्याचा फायदा अनेक ठिकाणी दिसून आलेला आहे. तर, काही रेल्वे स्थानकांवर याचा परिणाम झालेला नसून आतासुद्धा घरातील कचरा, घाण रेल्वे मार्गावर टाकल्याचे आढळते. तसेच, सांडपाण्याची वाहिनी रेल्वेच्या गटारात सोडली जाते. परिणामी, रेल्वे परिसर भकास आणि अस्वच्छ दिसून येतो. त्यामुळे, तब्बल 650 नोटीस पाठविण्याची योजना मध्य रेल्वे प्रशासनाने केली आहे.