मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात ६ जणांचा मृत्यू झाला तर ३६ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पालिकेकडून दोषींवर कारवाई करण्यात येत आहे. आज पालिकेने नव्याने पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या ऑडिटचा अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पूल धोकादायक नसल्याचा निर्वाळा देणाऱ्या स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाई, सी. व्ही. कंद कन्सल्टंट आणि स्ट्रक्टवेल डिझायनर अँड कन्सल्टंट या दोन कंपनीवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. सोबतच ऑडिट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आज गुन्हा दाखल करणार असल्याचे पालिकेकडून यावेळी सांगण्यात आले. सी. व्ही. कंद कन्सल्टंट या कंपनीने शहर आणि पश्चिम उपनगरातील १५७ पुलाचे तर स्ट्रक्टवेल डिझायनर अँड कन्सल्टंट कंपनीने पूर्व उपनगरातील ६६ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते.या कंपनींना पालिकेच्या काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे.