मुंबई -मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विनातिकीट आणि अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. 20 एप्रिल 2021 ते मे 2021 या काळात 1 लाख 50 हजार फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले. यातून मध्य रेल्वेने 9 कोटी 5 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
अशी केली कारवाई
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने 20 एप्रिल 2021 ते मे 2021पर्यंत उपनगरीय लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये नियमित आणि सखोल तिकीट तपासणीची मोहिम राबवली. मे महिन्यात विनातिकीट/अनियमित प्रवाशांची 54 हजार प्रकरणे आढळून आली. त्यातून 3 कोटी 33 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये उपनगरीय भागातील 32 हजार प्रकरणांचा समावेश आहे. त्यात 1 कोटी 65 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय गैर-उपनगरीय विभागात 22 हजार प्रकरणांचा समावेश आहे. त्यातून 1 कोटी 68 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.