मुंबई :राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात प्रामुख्याने उष्ण लहरींचा प्रादुर्भाव जाणवतो. राज्यामधील तापमानाची वर्गवारी करून त्याप्रमाणे मध्यम तीव्र आणि अति तीव्र अशा तीन वर्गवारीत विभागणी करण्यात आली आहे. राज्यातील 15 जिल्हे हे मध्यम स्वरूपाच्या उष्मा लाटांनी प्रभावित आहेत, तर प्रत्येकी 11 जिल्हे हे तीव्र आणि अतितीव्र उष्मा लाटांनी प्रभावीत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन संचालक आप्पासाहेब धुळाज यांनी दिली. राज्यात विदर्भात 40 अंश सेल्सिअस डोंगरी भागात 30 अंश सेल्सिअस, समुद्रकिनार पट्ट्यात 37 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान गेल्यास उष्म लहरी वाढल्याचे म्हटले जाते. या तापमानामध्ये साडेचार अंश सेल्सिअसची वाढ झाल्यास उष्ण लहरीमध्ये त्याचा समावेश करण्यात येतो.
काय होत आहेत तापमानात बदल? :जागतिक तापमानात अनेक बदल होत आहेत. अचानक येणारी वादळे, पावसाच्या प्रमाणात वाढ, घट तसेच उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत. अलिकडे वातावरण बदल मानाकनांनुसार पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने सांगितले आहे की, अलिकडच्या काळात उष्णतेच्या लाटांची तीव्रता, वारंवारता वाढली आहे. हवामान बदलामुळे तापमान आणखी वाढले आहे. 2004 ते 2019 दरम्यान पंधरापैकी अकरा सर्वात उष्ण वर्षे आली होती. गेल्या काही वर्षांपासून भारतात उष्णतेच्या लाटा वाढत चालल्या आहेत. ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर खूप मोठे परिणाम होत आहेत. आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे तसेच उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे धुळाज यांनी सांगितले.
उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यूचे उद्दीष्ट :उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दीष्ट गाठण्यासाठी राज्य शासन, विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था, या क्षेत्रात काम करणारे उद्योजक यांनी एकत्र येवून उष्णतेच्या लाटांसाठी तात्काळ नियोजन करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रभावी कृतीआराखडा बनविणे, उष्णतेच्या लाटांपासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्यास सरकारने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. दरम्यान राज्यात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 49 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले आहे.