मुंबई - सध्या देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील लॉकडाऊन हे ३ मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना विविध स्तरातून खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच, प्रशासनाकडून विविध उपाययोजना देखील राबवण्यात येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, म्हणून पोलीस प्रशासनही रस्त्यांवर तैनात आहेत. त्यामुळे विविध शहरांमध्ये नागरिकांनी प्रशासनाचे नियम पाळावेत, यासाठी विविध नियम तयार करण्यात आले आहेत. तसेच, नियम भंग करणाऱ्या विरोधात कारवाईदेखील करण्यात येत आहे.
कोल्हापुरात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी -
जगभरामध्ये कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका स्तरावर विविध उपाययोजना सुरू आहेत. कोल्हापूरसह जिल्ह्यात हजारो पानटपऱ्या, शॉप आहेत. गुटखा बंदी असली तरी अनेक ठिकाणी मावा मोठ्या प्रमाणात विकला जातो. मात्र, लॉकडाऊननंतर सर्वच दुकानं बंद झाली आहेत. त्यामुळे हे प्रमाण पूर्णपणे बंदच झालं आहे. तरीही काही ठिकाणी रस्त्यावर थुंकलेल्या लोकांवर महापालिका प्रशासनाकडून करवाई करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सार्वजनिक ठिकाणी थुंकले बद्दल नागरिकांनकडून 10 फेब्रुवारी ते 27 मार्च पर्यंत एकूण 24 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी 150 रुपये प्रमाणे एकूण 3400 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर आदी कर्मचारी ही कारवाई करत आहेत.
मुंबईतही सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी
मुंबईमध्ये रस्त्यावर थुंकल्यास 200 रुपये दंड होता. कोरोना व्हायरस संसर्गजन्य व थुंकीमधून पसरत असल्याने पालिकेने हा दंड 1000 रुपये केला. त्या प्रमाणे पालिकेने मागील महिन्यात 691 लोकांवर कारवाई करत 6 लाख 91 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच 577 लोकांना समज देण्यात आली. मात्र मुंबई महाराष्ट्रात सुरुवातीला जमावबंदी नंतर कर्फ्यु व लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊन दरम्यान नागरिक रस्त्यावर येणार नाहीत आणि थुंकणार नाहीत यामुळे सदर कारवाई थांबण्यात आली आहे..
नागपूर
कोरोनाच्या भीतीमुळे का होईना नागपूरकर आणि नागपूर महानगर पालिका स्वछतेविषयी गंभीर दिसून येत आहे. संपूर्ण भारतात नागपूर हे खर्रा कॅपिटल म्हणून ओळखले जात आहे. नक्कीच ही गोष्ट कोणत्याही नागपूरकरांना आवडनार नाही, पण हे वास्तव प्रत्येकाला कबुल करावेच लागणार. कोरोनामुळे मात्र थुंकण्याचे प्रकार अचानक कमी होताना दिसून येत आहेत. मध्यंतरी ज्यावेळी कोरोनाचा विषाणूंचा संसर्ग राज्यात कुठेही झाला नसताना पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. तेव्हापासून ही मोहीम अजूनही सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीदेखील सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगरण्यात आला होता. खर्रा खाऊन वाट्टेल तिथे थुंकीच्या पिचकाऱ्या मारणाऱ्यांमध्ये कारवाईचे भय निर्माण होऊ लागले होते. त्यामागे नागपूर मनपाची दंडाची वाढवलेली रक्कम आणि कोरोनाची भीती या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. खर्रा खाणाऱ्यावर अंकुश ठेवण्यासाठी एक ब्रम्हास्त्र नागपूर मनपाच्या हाती लागले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने का होईना आता शहरातील रस्ते सुंदर दिसायला लागले आहेत.