मुंबई - आगामी निवडणुका लक्षात घेता आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली आहे. मुंबई पोलिसांच्या १२ झोनमध्ये विनापरवाना हत्यार बाळगणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांच्या १२ झोनमधील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. खबऱ्यांच्या माहितीवरून पोलीस मुंबईत अनधिकृतपणे शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई करीत आहेत.
आगामी निवडणुका लक्षात घेता आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यांतर्गत कारवाई सुरू केली आहे. दिंडोशी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी किरण जाधव (वय ३६) यास अटक करण्यात आली आहे. कुरार पोलिसांनी आरोपी करीम उर्फ अब्दुल रहीम शेख (वय २८) या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर व एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. कस्तुरबा पोलिसांनी गावठी कट्टा तसेच एका जिवंत काडतुसासह आरोपी जयेश हेमंत बेंडले (वय २९) या आरोपीला अटक केली आहे.
दिंडोशी पोलीस ठाण्यांतर्गत १३ इंच लांबीचा चाकू बाळगणाऱ्या आरोपी विनायक कृष्णा गोमासे (वय २३) यास अटक करण्यात आली. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे अंतर्गत ९ इंच लाकडी मोठा असलेला चाकू बाळगणाऱया नदीम जमीन खान या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे पोलिसांनी १२.५ इंच लांबीचा सूरा बाळगणाऱ्या आरोपी मनोज भाऊसाहेब भोसले (वय २७) या आरोपीला अटक केली आहे.
या बरोबरच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत आरे पोलीस ठाणे अंतर्गत १५ लिटर ताडी जप्त करण्यात आली आहे. देवय्या लक्षछाव नागरी (वय ४०) या आरोपीला अटक केली आहे. कुरार पोलीस ठाणे अंतर्गत ४६८ रूपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी आरोपी सुखदेव लक्ष्मण जाधव (वय २५) यास अटक करण्यात आली आहे. अशाच प्रकारच्या इतर प्रकरणात पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून यापुढेही ही कारवाई सुरू राहणार आहे.