मुंबई - महापालिकेत पाच दिवसांचा आठवडा लागू झाला आहे. त्याचा परिणाम शनिवारी करण्यात आलेल्या प्लास्टिकविरोधी कारवाई दरम्यान दिसून आला. महापालिकेकडून प्लास्टिकविरोधात गेल्या आठवडाभर करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान दर दिवशी 132 ते 400 किलो प्लास्टिक जप्त केले जात होते. मात्र, शनिवारी सुट्टीच्या दिवशी फक्त 390 दुकानांना भेटी दिल्या आहेत. या भेटीदरम्यान 70 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून फक्त 50 किलो प्लास्टिक जप्त करण्यात पालिकेला यश आले आहे. यामुळे पाच दिवसांच्या आठवड्याचा पालिकेच्या कामावर आणि महसूली वसुलीवर परिणाम होताना दिसत आहे.
राज्यात 23 जून 2018 पासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून केली जात आहे. जून 2018 ते फेब्रुवारी 2020 पर्यंत पालिकेने 'ब्लू स्कॉड'ची स्थापना करत 16 लाख 324 दुकानांना भेटी दिल्या असून 85 हजार 840 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले आहे. या कारवाईदरम्यान 4 कोटी 64 लाख 30 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. 668 दुकानदारांनी दंड न भरल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली. तरीदेखील मुंबईत अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांसारख्या प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार मे 2020 पर्यंत महाराष्ट्र ‘सिंगल युज डिस्पोजेबल प्लास्टिकमुक्त’ करण्यासाठी पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे.
हेही वाचा -30 तासाहून अधिक वेळ राणा कपूर यांची चौकशी, समाधानकारक उत्तरे न दिल्यानं कोठडीत रवानगी
मुंबई महापालिकेकडून 1 मार्च पासून करण्यात येणाऱ्या प्लास्टिक विरोधी कारवाईदरम्यान दररोज 132 ते 408 किलो प्लास्टिक जप्त केले जात आहे. दर दिवशी 2 हजार ते 5600 दुकानांना भेटी देत 1 लाख 50 हजार ते 7 लाख 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र, शनिवारी सुट्टी असल्याने पालिकेने फक्त 390 दुकानांना भेटी देत 50 किलो 500 ग्राम इतके प्लास्टिक जप्त करत 70 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 1 मार्च पासून आठवडाभराच्या कालावधीत 23 हजार दुकानांना भेटी देत 2098 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून 25 लाख 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या आठवडाभरात करण्यात येणाऱ्या कारवाईच्या प्रमाणात शनिवारी सुट्टीच्या दिवशी प्लास्टिक विरोधी कारवाई थंडावली असल्याचे दिसून आले आहे.