माजी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया मुंबई :राज्यातील शेतकरी पावसामुळे हवालदिल झाला असताना त्याला दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दांडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम काहीसा अडचणीत सापडला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत, त्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पेरण्या केल्या नाहीत, त्यांच्यासमोर बोगस बियाण्यांचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
86 पैकी 59 कंपन्याचे बियाणे बोगस : मोठ्या प्रमाणात बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून दरवर्षी शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. राज्य सरकारने यावर्षी अशा बोगस बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांवर धाडसत्र सुरू केले, अशी माहिती राज्याचे माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यंनी दिली आहे. यामध्ये अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांनी बियाण्यांच्या पाकिटावर लिहिलेला कंटेंट त्या पाकिटात सापडत नाही. ज्या कंटेंटची नावे बाहेर आहेत त्याच्याशी आतल्या उत्पादनाचा संबंध नसतो. काही मुदत बाह्य बियाणे आढळले आहेत. औषध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. अनेक कंपन्यांकडून नमुने घेऊन आम्ही तपासणीसाठी पाठवले होते. यामध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यात 86 कंपन्यांपैकी 59 कंपन्यांची बियाणे, औषधे बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची निर्देश आपण दिले आहेत, असे माजी कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
परवाने रद्द करण्याच्या सूचना : ज्या कंपन्यांनी बोगस बियाणे साठवणूक केली आहे. ज्यांनी औषधावर चुकीचे कंटेंट लिहिलेले आहेत. अशा कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात येतील. ज्या कंपन्यांनी बियाणे साठवून ठेवले आहेत, त्यांनी ते कुठे साठवून ठेवले, त्याची अवस्था काय आहे, ते पेरण्यायोग्य आहेत का? हेही तपासले जाईल, अन्यथा तो साठा नष्ट केला जाईल, असे सत्तार म्हणाले. आम्ही 42 अधिकाऱ्यांचे एक पथक स्थापन केले आहे. या पथकाद्वारे कार्यवाही राज्यभरात सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्या साठा तपासून त्यावर कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये धाड टाकली असता तिथे 25 हजार रिकाम्या पिशव्या सापडल्या आहेत. या रिकाम्या पिशव्यांमध्ये मुदतबाह्य बियाणे भरून ते शेतकऱ्यांना देण्याची शक्याता आहे. सर्व बाबी तपासून त्यावर कारवाई केली जात आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. जे दोषी असतील त्यांचे परवाने रद्द केले जातील अशी ग्वाही सत्तार यांनी दिली.
कृषी विभागाचे धाडसत्र सुरूच : कृषी विभागाने विविध जिल्ह्यांमध्ये धाडसत्र सुरूच ठेवले आहे. नाशिकच्या द्वारका परिसरात अभिजीत सीड्स या बियाणे कंपनीत मान्यता नसलेली मुदतबाह्य कांदा पिकाची सुमारे 13 लाख किमतीचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहेत. तर वर्धा जिल्ह्यात कपाशीच्या बोगस बियाणाच्या कारखान्यावर धाड टाकली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती त्यांनी सत्तार यांनी दिली.
हेही वाचा -Jayant Patil Criticised : बोगस बियाणे विकणाऱ्यांना कोणाची साथ? जयंत पाटील यांचा सरकारला सवाल