मुंबई :अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीस यांच्याशी ओळख करून मैत्री करत विविध प्रकरणात अडकवण्यासाठी फोन केला. फोनवरून विविध प्रकारचे व्हाट्सअप चॅट आणि व्हिडिओ पाठवले आणि त्यानंतर खंडणीची मागणी केली. अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीनंतर अनिक्षा जयसिंघानीला मुंबई पोलिसांनी तुरुंगात धाडले होते.
अनिक्षा जयसिंघानीला कोठडी सुनावली होती :अनिक्षा जयसिंघानीने कोणत्या प्रकरणांमध्ये कोणाकोणाशी संबंध ठेवला आणि मोबाईल क्रमांकावरून कोणकोणत्या बेकायदेशीर बाबी केल्या हे तपासणे जरुरी असल्याचे सांगत सरकारी पक्षाच्या वकिलांनी मागील सुनावणी वेळीच अनिक्षा जयसिंघानीची कोठडी आवश्यक आहे, असे नमूद केले होते. त्यामुळे न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली होती.
संरक्षण मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव :आरोपी अनिल जयसिंघानीलादेखील पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा कथित आरोप ठेवला गेला. त्याच्या संदर्भात देखील कारवाई गतिमान केली गेली. या कथित आरोपाविरोधात अनिल जयसिंघानीने आता अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.
सुनावणी 27 मार्च 2023 रोजी होण्याची शक्यता :बुकी असलेला अनिल जयसिंघानी याच्यावर आधीच वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे पोलिसांना याबाबत त्याच्या सर्व व्यवहारासंदर्भात संशय आहे. म्हणूनच त्याला त्यांनी तुरुंगात धाडलेला आहे. या सर्व अटकेच्या संदर्भात अनिल जयसिंघानीचे म्हणणे आहे की, कथित आरोप बेकायदेशीर आहेत. त्यामुळेच मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याच्या वकिलांनी आता धाव घेतलेली आहे. याबाबतची पुढील सुनावणी 27 मार्च 2023 रोजी होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकारांमध्ये पोलिसांना आरोपी असलेली मुलगी अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांची संपूर्ण चौकशी करायची आहे त्यामुळे ते या याचिकेला काय आव्हान देतात ते 27 मार्च रोजी ठोस रीतीने समजेल.
हेही वाचा :Raj Thackeray: अटकेची टांगती तलवार; राज ठाकरे यांची उच्च न्यायालयात धाव, गुरुवारी होणार सुनावणी