मुंबई:सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील २० वर्षापूर्वीचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीचे नाव रुपेश राय (वय 45) असे आहे. सांताक्रुझ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल नेस्ट, विलेपार्ले स्टेशन समोर 2 एप्रिल 2003 ते 3 एप्रिल 2003 दरम्यान दिपक उर्फ देवा मुन्नावर राठोड, वय २३ वर्षे हा कापड व्यवसायिकाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तब्बल 20 वर्षांनी 45 वर्षीय इसमाला अटक करण्यात आली आहे.
अशी घडली घडली: तक्रारदार दिनकर विठ्ठल शेट्टी, हे हॉटेल नेस्ट या हॉटेलमध्ये रुम सहसबॉय म्हणून कामाला होते. या हॉटेलमध्ये 31 मार्च 2003 ला रूम क्रमांक १०८ मध्ये दोन इसम राहावयास आले होते. 3 एप्रिलला सकाळी १०.०० वाजता सदर रुमचा दरवाजा फिर्यादींनी ठोकुन पाहिला असता, कोणीही दरवाजा न उघडल्याने त्यांनी हॉटेल मॅनेजरला कळवून मास्टर कीने दरवाजा उघडला. तेथे बेडवर एक इसम चादर घेवुन झोपलेला आढळुन आला. त्यांनी त्यास हलवून उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो न उठल्याने त्याच्या अंगावरील चादर काढून पाहणी केली असता तो रक्ताच्या थारोळयात बेडवर मृतावस्थतेत आढळुन आला. परंतु त्याच्यासोबत आलेला त्याचा साथीदार मिळून आला नाही.
सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील २० वर्षापूर्वीचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. फरार आरोपी आपली ओळख बदलून अनेक राज्यात राहत होता. ही घटना 2 एप्रिल 2003 ची होती. आरोपीला ठाण्यात अटक केली आहे - सहपोलीस आयुक्त, सत्यनारायण चौधरी
खून करून फरार होता आरोपी: या गुन्हयातील मयत इसम हा गुन्हयातील अटक आरोपी याचे समवेत मुंबईत फिरण्याकरीता व कपडे खरेदीकरीता आला होता. अटक आरोपी हा मुळचा बिहार राज्यातील आहे. 2003 मध्ये खून केल्यानंतर तो पळुन गेला होता. गुन्हा नोंद केल्यानंतर पोलीस पथक त्याचा शोध घेण्याकरीता त्याचे मुळ गावी बिहार येथे गेले होते. परंतु तो त्याच्या गावी नव्हता. त्या नंतरही सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे पोलीस पथक १२ वेळा त्याचे मुळगावी गेले होते, परंतु आरोपीबाबत काहीही माहिती मिळून न आल्याने सदर गुन्ह्याचा तपास न्यायालयाचे परवानगीने तात्पुरता बंद करण्यात आला होता.